कोल्हापूर / संग्राम काटकर :
क्रीडा क्षेत्रातील परीक्षेत चिकाटीने परिश्रम घेतानाचा अनुभवाच्या जोरावर यश कसे मिळवता येते हे मंगळवार पेठेतील पुतण्या व त्याच्या काकीने अॅथलेटिक्स तांत्रिक पंच परीक्षेच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. उत्कर्ष यशदीप पाटील-मांगोरे व त्याची चुलती अश्विनी प्रकुल पाटील-मांगोरे अशी यशस्वी अॅथलेटिक्सपटूंची नावे आहेत. या दोघांनीही अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) नुकत्याच घेतलेल्या ऑल इंडिया अॅथलेटिक्स डीटीओ (डिस्ट्रीक्ट टेक्निकल ऑफिशियल) तांत्रिक पंच परीक्षेमध्ये अभ्यास व अनुभवाच्या जोरावर यश मिळवले आहे.
इतकेच नव्हे तर केवळ सोळा वर्षाचा असलेला उत्कर्ष हा देशातील सर्वात लहान अॅथलेटिक्स तांत्रिक पंच ठरला आहेत. त्याची चुलती अश्विनी ह्या देखील कोल्हापुरातील पहिल्या महिला अॅथलेटिक्स तांत्रिक पंच ठरल्या आहेत.
परीक्षा देण्यापूर्वी उत्कर्ष व अश्विनी या दोघांनीही गेल्या दोन-तीन वर्षाच्या कालावधीत कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशन आयोजित अनेक मैदानी स्पर्धांमध्ये सहाय्यक पंच व स्वयंसेवक म्हणून धुरा सांभाळत अपेक्षित अनुभव मिळवला होता. या अनुभवाच्या जोरावरच दोघांनीही ऑल इंडिया अॅथलेटिक्स डीटीओ तांत्रिक पंच परीक्षा देण्याचे पक्के केले. योगायोगाने गेल्या एप्रिल महिन्यात अॅथलेटिक्स फेडरेशन ऑफ इंडियाने (एएफआय) देशातील प्रत्येक जिल्हा पातळीवर अॅथलेटिक्स पंच परीक्षा होत असल्याचे जाहीर केले होते. त्याची माहिती कळताच कोल्हापूर जिह्यातील आजी-माजी अॅथलेटिक्स खेळाडूना पंच परीक्षा देण्यासाठी पुढे येण्याचे कोल्हापूर जिल्हा अॅथलेटिक्स असोसिएशनने आवाहन केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत अश्विनी पाटील-मांगोरे व उत्कर्ष पाटील-मांगोरे या दोघा चुलती व पुतण्यासह 26 जणांनी मनात एक ध्येय ठेवून ऑल इंडिया अॅथलेटिक्स डीटीओ तांत्रिक पंच परीक्षा देण्यासाठी पुढाकार घेतला.
परीक्षेपूर्वी एएफआयने मैदानी स्पर्धाच्या पार्श्वभूमीवर बनवलेल्या अभ्यासक्रमानुसार ऑनलाईन पद्धतीने कोर्स आयोजित केला. या कोर्समध्ये एएफआयच्या प्रतिनिधींनी ऑनलाइन पद्धतीने धावणे, अडथळा शर्यत, मॅरेथॉन, क्रॉस कंट्री, चालण्याच्या स्पर्धासह गोळा फेक, थाळीफेक, भालाफेक, हातोडा फेक, लांबउडी, उंचउडी, तिहेरीउडी, बांबू उडी, रिले व कम्बाईन इव्हेंट आदी संदर्भातील माहिती 26 उमेदवारांना दिली. त्यानंतर जून महिन्यात एएफआयच्या प्रतिनिधींनीच 26 जणांची लेखी व तोंडी परीक्षा घेऊन निकाल जाहीर केला. अश्विनी यांनी 86.15 टक्के गुण प्राप्त करत तिसरा क्रमांक मिळवताना कोल्हापुरातील पहिली महिला अॅथलेटिक्स तांत्रिक पंच होण्याचा बहुमान मिळवला. उत्कर्ष यानेही आपली चुलती अश्विनी यांच्या प्रमाणेच परीक्षेत मोठे यश मिळवत 85.38 टक्के गुण प्राप्त केले. या यशामुळे तर केवळ 16 वर्षीय उत्कर्ष हा देशातील सर्वात लहान अॅथलेटिक्स तांत्रिक पंच बनला आहे. आता अश्विनी व उत्कृर्ष हे दोघेही कोल्हापूर जिह्यासह महाराष्ट्रात जेथे जेथे जिल्हा राज्यस्तरीय अॅथलेटिक्स स्पर्धेचे आयोजन होईल तेथे तेथे ते अधिकृतपणे पंचगिरी करू शकणार आहेत. त्याच्या मोबदल्यात त्यांना स्पर्धा आयोजकांकडून मानधनही मिळणार आहे. शिवाय या दोघांनाही पंचगिरीतून मिळत राहणारा अनुभव एका मोठ्या उंचीवर जाण्यास कामी येणार हे मात्र नक्की आहे.
अश्विनी यांनी यांचे माहेर कबनूर (ता. हातकणंगले). त्यांनी कबनूर हायस्कूलमधून शालेय शिक्षण घेतले आहे. तसेच कॉमर्स कॉलेज व नाईट कॉलेजमधून महाविद्यालय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यांनी शाळा, कॉलेज व शिवाजी विद्यापीठ पातळीवर आयोजित 100 व 200 धावण्याच्या स्पर्धेत अनेक पदके प्राप्त ली आहेत. विद्यापीठ पातळीवरील प्रतिष्ठेच्या अश्वमेध क्रीडा स्पर्धेतील 100 मीटर धावणे स्पर्धेत सुवर्णपदक व राष्ट्रीय महिलांच्या धावणे स्पर्धेत कांस्य पदक मिळवले आहे. त्यांनी 2011 साली बीपीएड पूर्ण केले आहे. बीपीएडच्या पदवी परिक्षेत तर त्यांनी शिवाजी विद्यापीठात तिसरा क्रमांक मिळवला आहे.
उत्कर्षचे शालेय शिक्षण माईसाहेब बावडेकर अॅकॅडमीतून झाले आहे. सध्या तो न्यू कॉलेजमध्ये बारावी विज्ञानचे शिक्षण घेत आहे. त्यानेही शाळा व कॉलेज पातळीवर आयोजित केल्या गेलेल्या राज्य व राष्ट्रीय 80 मीटर अडथळा शर्यत स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. राज्यस्तरीय शालेय अडथळा शर्यत स्पर्धेत त्याने कांस्य पदक पटकवण्याची कामगिरी केली आहे.
- राज्य,आंतरराष्ट्रीय पातळीवरील परीक्षेची तयारी करणार
आम्ही दोघांनी आता कोल्हापूर जिल्हा व राज्यपातळीवरील अॅथलेटिक्स स्पर्धांमध्ये पंचगिरी करत मोठा अनुभव प्राप्त करण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवले आहे. तसेच राज्य, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवरील अॅथलेटिक्स पंच परीक्षा देणे हेही आमचे महत्वपूर्ण लक्ष्य असणार आहे. आगामी काळात आम्ही त्या दृष्टीने तयारी करणार आहोत.
अश्विनी पाटील-मांगोरे, उत्कर्ष पाटील-मांगोरे (अॅथलेटिक्स तांत्रिक पंच)








