चांद्रयान- 3 च्या यशस्वी लँडिंगनंतर 23 ऑगस्ट हा राष्ट्रीय अवकाश दिवस म्हणून साजरा केला जाईल अशी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. तसेच अवकाश संशोधनात मेक इन इंडियाला चालना देणे हि काळाची गरज असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बंगळूर येथिल इस्रो कमांड सेंटरमध्ये भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना संबोधित केले. चांद्रयान मिशनच्या यशाबद्दल चांद्रयान- 3 टीमचे अभिनंदन करण्यासाठी मोदींनी स्पेस एजन्सीच्या टेलीमेट्री ट्रॅकिंग आणि कमांड नेटवर्क मिशन कंट्रोल कॉम्प्लेक्सला भेट दिली.
आपल्या भेटीदरम्यान त्यांनी शास्त्रज्ञांना संबोधित केले. यावेळी पंतप्रधानांनी चंद्राच्या पृष्ठभागावरील चांद्रयान- 3 च्या टचडाउन पॉईंटला ‘शिवशक्ती’ म्हणून ओळखले जाईल अशी घोषणा केली. तसेच 2019 मध्ये चंद्रयान- 2 ज्या बिंदूवर क्रॅश-लँड केले त्या बिंदूला ‘तिरंगा’ म्हटले जाईल अशी घोषणाही त्यांनी केली.
यावेळी ते म्हणाले, “चांद्रयान 3 मिशनमध्ये महिला शास्त्रज्ञांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ‘शिवशक्ती’ पॉइंट आगामी पिढ्यांना लोकांच्या कल्याणासाठी विज्ञान वापरण्यासाठी प्रेरणा देईल…” असेही ते म्हणाले.
भारतीय शास्त्रज्ञांना मेक इन इंडियाला चालना देण्यासाठी आव्हाहन करताना त्यांनी ‘मेक इन इंडिया’ उपक्रम चंद्रावर नेल्याबद्दल त्यांनी इस्रोच्या शास्त्रज्ञांचेही कौतुक केले. आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार चांद्रयान मिशनच्या यशामुळे, केंद्राला खाजगी अवकाश प्रक्षेपण आणि संबंधित उपग्रह- आधारित व्यवसायांमध्ये गुंतवणुकीचा ओघ वाढण्याच्या आशा निर्माण झाल्या आहेत. असेही ते म्हणाले.