ऑग्मेंटेड रिअॅलिटी (एआर) तंत्रज्ञान हे आजच्या काळात सर्वात जास्त वापरले जाणारे
तंत्रज्ञान आहे. जपान, अमेरिका सारख्या देशात एआर तंत्रज्ञान हे रोजच्या वापरातील आहे. भारतात ह्याचा थोड्या थोड्या प्रमाणात वापर होत आहे. तसेच येणाऱ्या काही वर्षात भारतात एआर तंत्रज्ञान खूप प्रमाणात वापरले जाईल.
तंत्रज्ञानाच्या युगात नवनवीन प्रयोग, शोध लागत असतात. तसेच ते जगभर प्रसिद्ध होतात. ऑग्मेंटेड रिअॅलिटी हे त्यापैकी एक. ऑग्मेंटेड रिअॅलिटी हे माणसाला आभासी असलेल्या पण वास्तवात दिसत असणाऱ्या गोष्टींचा अनुभव देण्याची क्षमता असणारं हे तंत्रज्ञान.
बऱ्याच जणांना व्हर्च्युअल रिअॅलिटी व ऑग्मेंटेड रिअॅलिटी हे सारखेच आहे असे वाटते. मात्र तसे प्रत्यक्षात मात्र नाही आहे. व्हर्च्युअल रिअॅलिटीमध्ये या तंत्रज्ञाना मध्ये डोळ्यांवर गॉगलसारखे यंत्र घालावे लागते (हेडसेट). त्यानंतर आपण त्या दुनियेत गेलेले दिसतो. पण वास्तविकतेमध्ये तो एक आभास असतो. प्रत्यक्षात त्या वातावरणामध्ये आपल्याला गेल्यासारखे वाटते. परंतु आपण ऑग्मेंटेड रिअॅलिटी (एआर)मध्ये एआर हेडसेट घातला, तर याद्वारे आपण केवळ आपल्या सभोवतालची प्रत्येक गोष्ट पाहतोच पण नव्याने तयार झालेल्या गोष्टीही पाहू शकतो. म्हणजेच थोडक्यात वास्तविक जग आणि आभासी जग यांचे मिश्रण त्यात दाखवले जाते. ऑग्मेंटेड रिअॅलिटी या तंत्रज्ञानाद्वारे दर्शविलेल्या गोष्टी वास्तविक वातावरणाशी अशा प्रकारे जुळतात की त्या अगदी वास्तविक दिसतात. आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने हे शक्य झाले आहे. व्हर्च्युअल म्हणजे संपूर्ण आभासी, तर ऑग्मेंटेड म्हणजे वर्धित वास्तविकता, जिथे काही खऱ्या गोष्टी तुम्हाला दिसू शकतात.
ऑग्मेंटेड रिअॅलिटी असलेले उपकरण आजूबाजूला दिसणाऱ्या गोष्टींची माहिती, ही ग्राफिक्सच्या माध्यमातून दाखवू शकते. त्याच्याशी संबंधित कोणतीही माहिती देऊ शकते किंवा गोष्टी समजून घेण्यास मदत करू शकते.
ऑग्मेंटेड रिअॅलिटी हे तंत्रज्ञान प्रथम आपल्याला वापरायला मिळाले 2016साली. पोकेमोन गो नावाच्या एक मोबाईल गेममधून. ह्या खेळामध्ये ऑग्मेंटेड रिअॅलिटी हे तंत्रज्ञान वापरण्यात आले होते. या खेळामध्ये एका प्राण्याला पकडायचे असते. हा प्राणी सर्व ठिकाणाहून आपल्याला चुकवत पळत असतो. ह्या गेममधील हा प्राणी आभासी होता. मात्र इतर जे वातावरण होतं म्हणजे रस्ते, पूल, इमारती, हॉटेल्स, घर, बाग इत्यादी सगळं हे मोबाईलवर दिसत होतं. हे आपल्यानुसार तयार केले होते. ह्याच्यातला परिसर हा “रियल” होता तर प्राणी हा “व्हर्च्युअल” होता. हा खेळ इतका लोकप्रिय झाला की जगभरातल्या साडेचार कोटी लोकांना हे आभासी आणि अस्तित्व यातला फरक विसरायला लावला. हा खेळ खुप लोकप्रिय झाला. मात्र हा खेळत असताना विशेषत: लहान मुलांच्याबाबतीत अनेक दुर्दैवी घटना घडल्या. ज्यामुळे पालकांनी या खेळावर बंदी आणण्यासाठी विनंती केली. थोडक्यात काय तर या खेळामधला प्राणी हा आभासी तर जग हे वास्तविकता त्यामुळे अशा दोघांचे जे मिश्रण आहे त्यालाच आपण ऑग्मेंटेड रिअॅलिटी असं म्हणतो.
आता मात्र ऑग्मेंटेड रिअॅलिटी ही खेळापुरती मर्यादित न राहता ती वेगवेगळ्या गोष्टींसाठी व वेगवेगळ्या कामासाठी वापरायला सुरुवात झाली आहे. याचे अनेक अॅप्सही तयार झाले आहेत. याचा पहिला प्रयोग साधारण 1974-75 दरम्यान झाला, माहेरॉन क्रूगर या संशोधकाला याच्यात यश मिळालं. त्यांनी प्रोजेक्टर, व्हिडिओ कॅमेरा आणि एक खास तयार केलेले हार्डवेअर यांच्या मदतीने एक इंटरअॅक्टिव्ह जागा तयार केली. यामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी लावलेल्या
कॅमेऱ्यातून दृश्य टिपून ती इतर ठिकाणी लावलेल्या प्रोजेक्टरवर दाखवण्यात आली आणि असा संवाद साधला गेला. कदाचित हे आपल्याला आताच्या काळामध्ये थोडंसं सोपं वाटत असेल. पण ज्या काळामध्ये हे केलं त्यावेळी त्याची खूप चर्चा झाली.
थोडक्यात ऑग्मेंटेड रिअॅलिटीमधून आपण अशा पद्धतीने काहीतरी करू शकतो हे जगाला समजलं. त्यानंतर आणखीन एक गोष्ट घडली बोइंग कंपनीतल्या एका ऑफिसरला विमानाचे वायरिंग करण्यासाठी काय करता येईल आणि कशा पद्धतीने ते सोपे करता येईल याचा विचार करत असता त्याच्या संशोधक वृत्तीमुळे त्याला ऑग्मेंटेड रिअॅलिटी कल्पना सुचली आणि त्याने हे तंत्रज्ञान त्याने तिथे वापरले. तो पर्यंत ह्या तंत्रज्ञानाला नाव नव्हते. त्याला ऑग्मेंटेड रिअॅलिटी असे नाव दिले गेले. यानंतर नॉलेज बेस्ट ऑग्मेंटेड रिअॅलिटी फॉर मेंटेनन्स अँड असिस्टंट या नावाचे प्रशिक्षण या वैमानिकांसाठी तयार करण्यात आले.
आज विविध कंपन्या आपले ग्राहक वाढवण्यासाठी व टिकवू
न ठेवण्यासाठी या तंत्रज्ञानाचा खूप वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू लागले आहेत. म्हणजे असं की समजा आपल्याला एखादी बिल्डिंग किंवा घर बांधायचे आहे, तर आपलं घर नक्की कसे दिसेल, याची रचना कशी असेल, किंवा एखाद्या फर्निचरच्या शोरूम मध्ये गेल्यानंतर आपल्या खोलीमध्ये ते फर्निचर कसे बसू शकेल, त्याची वास्तविकता कशी असेल, हे आपण या या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पाहू शकतो. घ्ख्Aिं या फर्निचरच्या कंपनीने हे अॅप पहिल्यांदा बाजारात आणले त्यानंतर रोलेक्स कंपनीनेसुद्धा त्यांचे एक अॅप बनवले.
इंटिरियर डिझायनिंगसाठी ऑग्मेंटेड
रिअॅलिटीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर होत आहे. भिंतीना रंग कोणता द्यायचा, फर्निचर कुठे असावे, कुठल्या डिझाईनच्या टाइल्स वापराव्यात, किचन, बेडरूम, हॉलची सजावट कशी असावी हे क्लायंटला दाखवणे सोपे होऊन गेले आहे. एखादा चष्मा खरेदी करायचा असेल तर तो चष्मा आपल्या चेहऱ्याला कशा पद्धतीने सूट होऊ शकतो हेही आपल्याला याद्वारे पाहता येते. लेन्सकार्ट या कंपनीने अशा पद्धतीचा वापर करून आपल्या क्लायंटना आकर्षित केले आहे. अर्थात अशा ठिकाणी आणि अनेक गोष्टींसाठी आपण याचा वापर करू शकतो.
यामध्ये दागिने, अंगातले कपडे, बूट ह्या वैयक्तिक गोष्टीसुद्धा कशा पद्धतीने आपल्याला सूट होऊ शकतात, आपण ते घातल्यानंतर कसे दिसू हे ऑग्मेंटेड रिअॅलिटीच्या माध्यमातून बघू शकतो. आता आरोग्य सेवा, म्हणजे इतके की एखादे पोस्टमार्टम प्रत्यक्ष करायच्या ऐवजी ऑग्मेंटेड रिअॅलिटीच्या माध्यमातून पोस्टमार्टम कसं करावं हेही शिकवलं जाऊ शकतं.
शैक्षणिक संस्था, युनिव्हर्सिटी किंवा एज्युकेशनल इन्स्टिट्यूट हेही या ऑग्मेंटेड रिअॅलिटीचा वापर करू लागले आहेत. संगणक शास्त्रामध्ये एखादा प्रोग्राम कशा पद्धतीने लिहायचा त्याचा आउटपुट कसा येऊ शकतो हेही आपल्याला ऑग्मेंटेड रिअॅलिटीद्वारा मुलांना समजावणे सोपे होऊ लागले आहे.
थोडक्यात काय तर ऑग्मेंटेड रिअॅलिटी हे भविष्यामध्ये आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक होणार आहे हे नक्की.
विनायक राजाध्यक्ष








