प्रतिनिधी / बेळगाव
व्यवसाय करीत असतानाच आपण मिळविलेल्या नफ्याचा काही भाग समाजासाठी राखून ठेवून लाखो रुपयांच्या देणग्या विविध संस्थांना देणारे अडत व्यापारी शंकरराव गंगाराम पाटील यांनी हयात असताना आपल्या जाफरवाडी गावाकरिता सभागृह बांधण्याची योजना आखली होती. ती प्रत्यक्षात साकारली असून त्या कै. सौ. मंजुताई शंकरराव पाटील सभागृहाचे उद्घाटन सोमवारी जाफरवाडी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या उद्घाटन समारंभाच्या अध्यक्षस्थानी जाफरवाडीचे ज्येष्ठ नागरिक पिराजी कल्लाप्पा पाटील होते. पाहुणे म्हणून ज्येष्ठ पत्रकार मनोहर कालकुंद्रीकर, व्यापारी गजानन काविलकर, श्रीकांत कृष्णा पाटील उपस्थित होते. वक्ते म्हणून जी. एस. एस. महाविद्यालयाचे माजी प्राचार्य आनंद मेणसे उपस्थित होते.
दीपप्रज्वलन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. सभागृहाच्या उभारणीसाठी सहकार्य केलेल्या अनेकांचा भेटवस्तू व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. ग्रामस्थांच्यावतीने प्रकाश आणि किरण यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला. श्रीकांत कृष्णा पाटील यांनी गौरवोद्गार काढले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी शंकरराव पाटील यांच्या जीवनकार्याचा आढावा घेतला. सरोज पाटील यांनी आभार मानले. सूत्रसंचालन अनंत लाड यांनी करून शंकरराव पाटील यांच्या जीवनाचा आढावा घेतला.









