तिकीटे संपली, शौकिनांची निराशा
वृत्तसंस्था / दुबई
रविवारी येथे 2025 च्या चॅम्पियन्स करंकड क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. या सामन्याची तिकीटे यापूर्वीच विकली गेल्याने बऱ्याच क्रिकेट शौकिनांच्या पदरी निराशा झाली आहे. या शेवटच्या सामन्यासाठी दुबईच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर 25 हजार तिकीटे उपलब्ध करुन देण्यात आली होती.
या सामन्यासाठी तिकीटांचे दर प्रत्येकी 250 ते 12000 डिरॅम आकारण्यात आले आहेत.तिकीट विक्रीतून आयोजकांना सुमारे 9 दशलक्ष डिरॅम मिळणार आहे. तिकीटे खरेदी करण्यासाठी विदेशातून गेल्या चार दिवसांपासून शौकिनांचे प्रयत्न चालु होते. काही शौकिनांना तिकीटे उपलब्ध झाली तर बरेच जण तिकीट न मिळाल्याने नाराज झाले. दुबईतील सर्व पंचतारांकित हॉटेल गेल्या दोन दिवसांपासून आरक्षित करण्यात आली आहेत. या अंतिम सामन्याला शौकिनांचा प्रचंड प्रतिसाद लाभत असल्याने दुबईच्या पर्यटन विभागाला त्याचा अधिक लाभ मिळणार आहे.
या स्पर्धेतील भारतीय संघाने अंतिम फेरीपर्यंत मजल मारताना एकही सामना गमविलेला नाही. तर न्यूझीलंडने अंतिम फेरी गाठताना एकमेव सामना या स्पर्धेत गमविलेला असून त्यामध्ये भारताने त्यांचा पराभव केला होता. आता पुन्हा दोन्ही संघ रविवारी आमने-सामने येत असल्याने शेवटच्या चेंडूपर्यंत चुरस पाहण्याची संधी शौकिकांना अपेक्षित आहे. 2000 सालातील आयसीसीची चॅम्पियन करंडक स्पर्धा न्यूझीलंडने जिंकली होती. न्यूझीलंडच्या नेतृत्वाची जबाबदारी यावेळी मिचेल सॅनेंटनरवर सोपविण्यात आली आहे. या स्पर्धेतील प्राथमिक फेरीत पराभुत झालेला न्यूझीलंडचा संघ या मागील पराभवाची परतफेड करण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करेल. दरम्यान रोहीत शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने या स्पर्धेत आतापर्यंत सर्वच विभागात दर्जेदार कामगिरी करत सांघिक कामगिरीच्या जोरावर आपली वाटचाल अंतिम फेरीपर्यंत केली असून याची पुनरावृत्ती रविवारच्या अंतिम सामन्यात करण्यासाठी भारतीय संघ सज्ज झाली आहे. रविवारच्या सामन्यात न्यूझीलंडचा केन विलियमनसन आणि भारतीय फिरकी यांच्यातील द्वंद्व पहायवास मिळेल.









