वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जर्मन लक्झरी कार निर्मिती ऑडीने मंगळवारी सांगितले की ते पुढील महिन्यात आपल्या सर्व मॉडेल्सच्या किमती 2.4 टक्क्यांनी वाढविणार आहे. सध्या कच्चामाल आणि पुरवठा साखळीतील वाढत्या खर्चामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने एका निवेदनात म्हटले आहे. कंपनीचा हा नवा नियम 20 सप्टेंबर 2022 पासून लागू होणार असल्याची माहिती आहे.
ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग ढिल्लन म्हणाले, ‘ऑडी इंडियामध्ये, आम्ही व्यवसाय वाढीसाठी प्रयत्नशील आहोत. कच्चामाल आणि पुरवठा साखळीतील वाढत्या खर्चामुळे आम्हाला आमच्या मॉडेल्सच्या किमती 2.4 टक्क्यांपर्यंत वाढवाव्या लागणार आहेत.
ऑडी इंडिया पेट्रोल मॉडेल्समध्ये ए4, ए6, ए8एल, क्यू5, क्यू7, क्यू8, एस5 स्पोर्टबॅक, आरएस5 स्पोर्टबॅक आणि आरएस क्यू8 याचा समावेश होणार आहे. कंपनीने ई-ट्रॉन ब्रँड अंतर्गत इलेक्ट्रिक वाहनांसाठी सवलत दिली आहे.









