बेळगाव : कॅम्प फिशमार्केट येथील दुकान गाळ्यांची लिलाव प्रक्रिया बुधवारी पार पडली. भाडे भरलेल्या गाळेधारकांना लिलाव प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी देण्यात आली. यामुळे बुधवारी दिवसभर कॅन्टोन्मेंट बोर्ड कार्यालयात गाळेधारकांची गर्दी झाली होती. काही गाळेधारकांनी भाडे वेळेत न भरल्याने त्यांनी लिलाव प्रक्रिया एक महिन्यासाठी थांबवावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. फिशमार्केटमध्ये एकूण 19 दुकानगाळे आहेत. 2023 मध्ये झालेल्या लिलाव प्रक्रियेत गाळे घेतलेल्या काहींनी भाडे भरलेले नाही. एका दुकानगाळ्याचे भाडे अंदाजे 1000 ते 1500 रुपये निश्चित करण्यात आले होते. सध्या तीन लाख रुपये भाडे थकीत आहे. बुधवारी कॅन्टोन्मेंट सीईओ राजीवकुमार यांनी लिलाव प्रक्रियेचे आयोजन केले होते. परंतु सकाळी काही दुकानगाळेधारकांनी भेट घेऊन भाडे भरण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली होती.
इतर दुकानगाळ्यांचे लिलाव पूर्ण
परंतु ही प्रक्रिया अधिक लांबली जात असल्याने बुधवारी विरोध झुगारून लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. ज्या गाळेधारकांनी भाडे थकविले आहे, ते वगळून इतर दुकानगाळ्यांचे लिलाव पूर्ण करण्यात आले. त्यामुळे कॅन्टोन्मेंट बोर्डला वेळेत महसूल मिळणे शक्य होणार आहे.
मुदतवाढ मिळण्यासाठी गाळेधारकांची धडपड
बुधवारी कॅन्टोन्मेंट बोर्डची मासिक बैठक पार पडली. या बैठकीनंतर फिश मार्केटमधील गाळेधारकांनी सीईओंची भेट घेऊन भाडे भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, अशी मागणी केली. तसेच भाडे भरल्यानंतर एकाचवेळी लिलाव प्रक्रिया राबवा, असे सांगण्यात आले. परंतु काही गाळेधारकांनी लिलाव प्रक्रिया आजच घ्या, असे मत व्यक्त केल्याने बुधवारी ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.









