बेळगाव : फलोत्पादन खात्याकडून अशोकनगर येथे उभारण्यात आलेल्या फूल मार्केटचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे. परवानाधारक व्यापारी आणि फूलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना गाळ्यांचे वितरण केले जाणार आहे. लिलावामध्ये सहभागी होण्यास इच्छुक असणाऱ्यांनी चन्नम्मा सर्कल येथील फलोत्पादन खात्याच्या साहाय्यक संचालक कार्यालयाला भेट देऊन अर्ज दाखल करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाजी मार्केट, फळ मार्केटप्रमाणेच आता फुलांची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालाला योग्य हमीभाव व त्याची विक्री करता यावी, यासाठी फलोत्पादन खात्याच्यावतीने अशोकनगर येथे फूल मार्केट बांधण्यात आले आहे. फूल मार्केटचे काम पूर्ण झाले असल्याने त्या ठिकाणी बांधण्यात आलेल्या गाळ्यांचा लिलाव केला जाणार आहे.
दोन वर्षासाठी गाळे भाडेकरार तत्त्वावर दिले जाणार आहेत. त्यापैकी गाळे क्र. 1 ते 6 महापालिकेकडून किंवा ग्राम पंचायतीकडून फूलविक्रीचा अधिकृत परवाना असलेल्यांना त्यांचे वितरण केले जाणार आहे. तर गाळे क्र. 7 ते 10 हे फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना राखीव ठेवण्यात आले आहेत. लिलाव प्रक्रियेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी 1 ते 25 एप्रिल 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यात फुलशेती करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे.
मात्र, फुलांची विक्री करण्यासाठी मार्केट नसल्याने शेतकऱ्यांना गांधीनगर येथे रस्त्यावर थांबून फुलांची विक्री करावी लागत होती. त्यामुळे फुलविक्रेत्या शेतकऱ्यांसाठी फूल मार्केट बांधण्यात यावे, अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येत होती. त्यामुळे फलोत्पादन खात्याकडून अशोकनगर येथे प्रशस्त जागेत फूल मार्केट उभारले आहे. लवकरच हे फूल मार्केट सुरू होणार असून यानंतर शेतकरी आणि व्यापाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.









