कोल्हापूर प्रतिनिधी
जिल्हा परिषदेतील मुख्य लेखा व वित्त अधिकारी व्ही.टी.पाटील यांची बदली झाल्यामुळे रिक्त झालेल्या पदावर मुंबई येथील अधिदान व लेखा कार्यालयातील सहाय्यक अधिदान व लेखा अधिकारी अतुल आकुर्डे यांनी नियुक्ती झाली आहे. आकुर्डे यांनी नुकताच पदभार स्विकारला असून विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामकाजाचा आढावा घेतला.
आकुर्डे यांनी 10 ऑक्टोबर 2010 ते 31 मे 2011 या कालावधीत डॉ. बुधाजीराव मुळीक कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयात सहाय्यक प्राध्यापक म्हणून काम केले आहे. 1 जून 2011 ते 31 जानेवारी 2012 या कालावधीत औरंगाबाद येथील लेखा व कोषागार कार्यालयामध्ये परिविक्षाधीन अधिकारी होते. फेब्रुवारी 2012 ते 31 मे 2012 या कालावधीत भंडारा येथे जिल्हा लेखा परीक्षा अधिकारी म्हणून काम पाहिले. 4 जून 2012 ते 15 जून 2016 या कालावधीत त्यांनी मंत्रालयातील अन्न व नागरी पुरवठा विभागात सहाय्यक संचालक म्हणून कर्तव्य बजावले. तर 16 जून 2016 ते 30 सप्टेबर 2020 या कालावधीत मुंबई येथील महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (कोकण मंडळ) मुख्य लेखा अधिकारी म्हणून कामकाज पाहिले.









