विविध आकारामध्ये सिरॅमिक रंगीबेरंगी कुंडय़ा : येत्या शनिवारपासून तुळशी विवाहास प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
येत्या शुक्रवारी पौर्णिमा असून शनिवारपासून तुळशी विवाहास प्रारंभ होत आहे. बाजारात विविध आकारांमध्ये तुळशी कुंडय़ा विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. नवीन तुळस बांधणाऱयांकडून या कुंडय़ांना मागणी वाढत आहे. विविध आकारामध्ये सिरॅमिकच्या कुंडय़ा उपलब्ध झाल्या आहेत. दिसायला आकर्षक आणि रंगीत असलेल्या कुंडय़ा आकर्षण ठरत आहेत.
हिंदू धर्मात तुळशी विवाहानंतर विवाहाचे मुहूर्त साधले जातात. त्यामुळे तुळशी विवाहाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. घराच्या अंगणात किंवा परसात तुळशी वृंदावन बांधून त्यावर कुंडय़ा ठेवल्या जातात. तुळशी विवाह जवळ आल्याने कुंडय़ांना मागणी वाढू लागली आहे. तुळशी वृंदावन बांधण्यासाठी तयार कुंडय़ा उपलब्ध झाल्या आहेत. साधारण अडीचशे ते दीड हजारापर्यंत त्यांचा दर आहे. अलीकडे अपार्टमेंटमध्ये अशा कुंडय़ा ठेवून तुळशी पूजन केले जाते. साधारण दोन फुटाच्या तुळशी कुंडीचा दर सातशे रुपयांपर्यंत तर लहान कुंडीचा दर अडीचशे रुपये आहे. बाजारपेठेसह इतर ठिकाणीही कुंडय़ा विक्रीसाठी ठेवल्या आहेत. अलीकडे मातीच्या कुंडय़ांऐवजी सिरॅमिक कुंडय़ांना मागणी वाढली आहे. त्यामुळे बाजारात सिरॅमिक कुंडय़ा दाखल झाल्या आहेत. विविध रंगांमध्ये ठेवलेल्या कुंडय़ा ग्राहकांना आकर्षित करत आहेत. तुळशी विवाह अगदी सहा दिवसांवर आल्याने मागणी वाढत आहे.
यंदा मागणीत वाढ
विविध आकारामध्ये तुळशी कुंडय़ा उपलब्ध आहेत. तुळशी विवाह जवळ आल्याने मागणी वाढत आहे. मागील दोन वर्षात म्हणावी तशी विक्री झाली नव्हती. मात्र, यंदा मागणी वाढत आहे. सिरॅमिकच्या कुंडय़ा विविध आकारामध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
– विनायक गुंजीकर (विपेते)









