दहा-बारा दिवसांवर दिवाळी सण : बाजारपेठेत बहर, मागणीत वाढ
प्रतिनिधी /बेळगाव
दिवाळी अगदी दहा पंधरा दिवसांवर येऊन ठेपल्याने दिवाळीच्या साहित्यांनी बाजारपेठ बहरताना दिसत आहे. बाजारात प्रकाशाचा झगमगाट करणारे दिवे आणि पणत्या विक्रीसाठी दाखल झाल्या आहेत. यामध्ये विविध डिझाईन, रंगसंगती, आकार यासह वेगवेगळय़ा प्रकारच्या पणत्या दाखल होऊ लागल्या आहेत. कोरोनानंतर येणारी पहिली दिवाळी उत्साहात साजरी करण्यासाठी नागरिकांची रेलचेलही पहायला मिळत आहे.
दिव्यांचा सण म्हणून ओळखल्या जाणाऱया दिवाळीचा पहिला दिवस म्हणजेच वसुबारसं अवघ्या दहा दिवसांवर आहे. त्यामुळे बाजारात विविध साहित्यांबरोबर आकर्षक दिवे व पणत्या दाखल झाल्या आहेत. कोरोनामुळे दोन वर्षांत सण-उत्सवावर मर्यादा आल्या होत्या. मात्र आता सण-उत्सव मोठय़ा उत्साहात साजरे केले जात आहेत. त्यामुळे बाजारपेठेला देखील बहर आला आहे. शिवाय कोरोनानंतर दिवाळी साजरी करण्यासाठी नागरिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. बाजारात दिवाळीसाठी आकाश कंदील, पणत्या, मेणबत्त्या, रांगोळी,
मातीचे दिवे, तोरण, शुभ-लाभ, लक्ष्मीची पावले आदी साहित्य दाखल झाले आहे. त्यामुळे दुकानेही दिवाळीच्या साहित्यांनी सजताना दिसत आहेत.
दिव्यांचा सण असलेल्या दिवाळीसाठी विविध आकारातील पणत्या आणि लक्ष्मी पूजनासाठी लागणारे दिवे बाजारात दाखल झाले आहेत. पारंपरिक पणत्यांना आकर्षक रंगीत साज चढविण्यात आला आहे. अशा पणत्यांना मागणी वाढत आहे. टिकल्या, घुंगरू आदी टेंड असलेल्या पणत्याही पहायला मिळत आहेत. साधारण 20 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत डझन असा पणत्यांचा दर आहे. तर दिवे 20 रुपयांपासून 50 रुपयांपर्यंत एक असे आहेत. आकर्षक मोठे दिवे 100 ते 200 रुपयांपर्यंत उपलब्ध आहेत. वाहतूक खर्च, माती, रंग व अन्य सामग्रीच्या दरात वाढ झाल्याने पणती आणि दिव्यांच्या दरात काहीशी वाढ झाली आहे.
बाजारात रंगीबेरंगी आकर्षक पणत्यांचा टेंड…
बाजारात पारंपरिक पणत्यांबरोबर आकर्षक पणत्यांचा टेंड निर्माण झाला आहे. रंगीबेरंगी विविध आकारांमध्ये पणत्या दाखल झाल्या आहेत. त्यामुळे ग्राहकांचा कलदेखील या पणत्यांकडे वाढला आहे. पारंपरिक पणत्यांना रंगीत साज चढल्याने मागणी वाढली आहे.
पणत्या-दिव्यांच्या दरात वाढ
खानापूर ग्रामीण भागातील चाकावर तयार झालेल्या पणत्या आणि दिवेदेखील विक्रीसाठी ठेवण्यात आले आहेत. त्याबरोबर कलकत्ता, बिहार येथून रंगीबेरंगी आकर्षक पणत्या दाखल झाल्या आहेत. वाहतूक खर्च आणि इतर सामग्रीच्या दरात वाढ झाल्याने पणत्या आणि दिव्यांचे दर काहिसे वाढले आहेत.
– विनायक गुंजीकर (पणत्या-दिवे विपेते)









