पॉलिहाऊसमध्ये यशस्वी प्रयोग : लिथियंथस फुलांचे आकर्षण : बागायतदारांना आवाहन
बेळगाव : शेडेगाळी, ता. खानापूर येथे बागायत खात्यामार्फत उभारलेल्या शोभिवंत प्रकल्पामध्ये प्रायोगिक तत्त्वावर लावलेल्या लिथियंथस फुलांची बाग बहरली आहे. त्यामुळे बागायतदारांनी या फुलांची लागवड करून आर्थिक पाठबळ मजबूत करावे, असे आवाहन बागायत खात्याने केले आहे. शेडेगाळी येथे तब्बल 30 एकर क्षेत्रात हा प्रकल्प राबविण्यात आला आहे. यामध्ये विविध रोपांची लागवड, कम्पोस्ट खत प्रकल्प, गो-शाळा, प्रशिक्षण केंद्र, नर्सरी, तलाव बांधण्यात आला आहे. या प्रकल्पामध्ये पाच गुंठ्यात लिथियंथस या विदेशी फुलांच्या रोपांची लागवड करण्यात आली होती. हा फुलांचा प्रयोग स्थानिक वातावरणात यशस्वी झाला आहे. विशेषत: या एका फुलाची किंमत 30 ते 40 रुपये आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनी किंवा बागायतदारांनी या फुलांच्या रोपांची लागवड करून आर्थिक घडी मजबूत करावी, असेही खानापूर बागायत खात्याचे साहाय्यक निर्देशक राजकुमार टाकळे यांनी म्हटले आहे.
साधारण 75 ते 90 दिवसांपूर्वी लावलेली रोपे आकर्षक ठरू लागली आहेत. त्यांना लागलेली लिथियंथस पांढऱ्या व लाल रंगांची फुले सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. साधारण 20 एकर पॉलिहाऊसमध्ये 40 हजार रोपांची लागवड करता येते. वर्षातून दोनदा या फुलांची तोडणी होऊ शकते. लग्नसराई, कार्यक्रम, सण-समारंभ आणि हंगामाच्या काळात या फुलांना बाजारात अधिक मागणी असते. एक फूल 30 ते 40 रुपयांना विक्री होते. त्यामुळे कमी खर्चात अधिक उत्पादन मिळवता येते. स्थानिक शेतकऱ्यांना विदेशी फळा-फुलांची माहिती उपलब्ध व्हावी, यासाठी प्रकल्प उभारण्यात आला आहे. या ठिकाणी विदेशी फळा-फुलांची लागवड करण्यात आली आहे. वर्षभरापूर्वी लावलेल्या रोपांना फळे आणि फुले दिसू लागली आहेत. विशेषत: विदेशी फुलांनी प्रकल्प सजला आहे. त्यामुळे प्रकल्पातील फुले ये-जा करणाऱ्यांचे आकर्षण ठरू लागली आहेत. मलप्रभा नदीशेजारी हा प्रकल्प उभारण्यात आल्याने मुबलक प्रमाणात पाणीही उपलब्ध आहे. विशेषत: या रोपांना पालापाचोळा आणि टाकाऊ पदार्थांतून सेंद्रिय खत दिले जात आहे. त्यामुळे शेडेगाळीतील विदेशी फुले सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहेत.
शेतकऱ्यांना फायदेशीर
शेडेगाळी प्रकल्पात विदेशी फुलांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये लिथियंथस नावाच्या फुलांचा प्रयोग यशस्वी झाला आहे. या फुलांना मागणीदेखील अधिक आहे. शिवाय दरही समाधानकारक आहे. पॉलिहाऊसमध्ये या रोपांची लागवड करता येते. शेतकऱ्यांनी या फुलांच्या जातीकडे वळावे.
– महांतेश मुरगोड (सहसंचालक, बागायत खाते)









