पोस्टमन चौकातील सर्व खड्डे बुजविले : पण धोकादायक खड्डय़ांकडे दुर्लक्ष : महापालिका-कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाबाबत संताप
प्रतिनिधी /बेळगाव
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजविण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहीम वेळी पोस्टमन चौकातील खड्डे लहान खडी टाकून बुजविण्यात आले आहेत. मात्र याच ठिकाणी स्टेशन रोडवर निर्माण झालेले केवळ तीन मोठे खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. या प्रकाराबद्दल सखेद आर्श्चय व्यक्त करण्यात येत आहे.
पावसामुळे शहरांतर्गत संपूर्ण रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. प्रत्येक रस्त्यावर खड्डय़ांचे साम्राज्य निर्माण झाल्याने रस्त्यावरून गणरायांना आणायचे कसे? असा मुद्दा उपस्थित झाला होता. शहरातील रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात यावेत, अशी मागणी महापालिकेकडे आणि जिल्हा प्रशासनाकडे करण्यात आली होती. याची दखल घेऊन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर खड्डे बुजविण्याची मोहीम महापालिकेकडून राबविण्यात आली आहे. काही ठिकाणी पेव्हर्स घालण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी चिपिंग आणि सिमेंट काँक्रिट घालून खड्डे बुजविण्यात आले. तसेच पोस्टमन चौकातील रस्ता पूर्णपणे खराब झाला असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाल्याने पावसाचे पाणी साचत आहे. शहापूर तसेच अनगोळ परिसरातील काही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या मूर्ती कपिलेश्वर तलावामध्ये विसर्जित करण्यात येतात. त्यामुळे पोस्टमन चौकातील खड्डे बुजविण्याची मागणी करण्यात आली होती. हा परिसर कॅन्टोन्मेंट हद्दीत येत असल्याने कॅन्टोन्मेंटकडून कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.
तीन खड्डय़ांमध्ये किती खडी लागली असती?
महापालिकेने चौकातील खड्डे पेव्हर्स ऐवजी केवळ खडी टाकून बुजविले आहेत. पोस्टमन पुतळय़ासभोवती निर्माण झालेले सर्व खड्डे बुजविले. पण पोस्ट कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर निर्माण झालेले खड्डे बुजविण्यात आले नाहीत. हे खड्डे मोठय़ा आकाराचे असून केवळ तीन खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्यामुळे या तीन खड्डय़ांमध्ये किती खडी लागली असती? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे. महापालिकेच्या या कारभाराबद्दल आणि कंत्राटदाराच्या बेजबाबदारपणाबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
विसर्जनापूर्वी हे खड्डे बुजविण्याची दखल घेण्यात येईल का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कॅन्टोन्मेंट आणि महापालिकेच्या अधिकाऱयांनी याकडे लक्ष देऊन धोकादायक खड्डे बुजवावे, अशी मागणी होत आहे.









