म. ए. युवा समितीचे आवाहन
बेळगाव : कन्नडसक्ती विरोधी आंदोलनामध्ये सीमाभागातील नऊ निष्पाप मराठी भाषिकांना हौतात्म्य आले. 1 जून 1986 रोजी झालेल्या या आंदोलनामध्ये कित्येक कार्यकर्त्यांना अटक करून तुरुंगात डांबण्यात आले. हुतात्म्यांच्या बलिदानाची आठवण ठेवून सीमाप्रश्नाच्या सोडवणुकीसाठी सर्वांनी कटिबद्ध राहणे गरजेचे आहे. 1 जून रोजी सकाळी 8.30 वाजता हिंडलगा येथील हुतात्मा स्मारक येथे सर्व मराठी भाषिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन युवा समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी केले. शुक्रवारी युवा समितीची बैठक टिळकवाडी येथील कार्यालयात पार पडली. प्रारंभी श्रीकांत कदम यांनी प्रास्ताविक करून हुतात्मा दिनाच्या अभिवादनाची पार्श्वभूमी सांगितली. यानंतर अनेकांनी मनोगत व्यक्त केले. सीमालढ्यामध्ये अधिकाधिक तरुण पिढी सहभागी होण्यासंदर्भात कार्यक्रम आखण्याचे निश्चित करण्यात आले. यावेळी कार्याध्यक्ष सचिन केळवेकर, उपाध्यक्ष गुंडू कदम, खजिनदार विनायक कावळे, सुरज कुडुचकर, अश्वजित चौधरी, आकाश भेकणे, निखिल देसाई, प्रवीण धामणेकर, रितेश पावले यांच्यासह इतर उपस्थित होते. प्रतिक पाटील यांनी आभार मानले.









