ग्रामस्थांना अंधारात ठेऊन ग्रामसभा घेण्याचा होता प्रयत्न : पीडीओंना धरले धारेवर
वार्ताहर/सांबरा
मुतगे येथे ग्रामस्थांना अंधारात ठेवून ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. मात्र ऐनवेळी ग्रामस्थांच्या हा प्रकार लक्षात आल्याने ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे ग्रामसभा रद्द करावी लागली. बुधवार दि. 2 रोजी ग्रामपंचायत कार्यालयमध्ये अचानक ग्रामसभेचा फलक लावून काही मोजक्याच सदस्यांव ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेण्याची तयारी चालविली होती. याची कुणकुण ग्रामस्थांना लागली. त्यानंतर ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन याबाबत पीडीओंना विचारले असता त्यांच्याकडून समर्पक उत्तर मिळाले नाही.
त्यामुळे ग्रामस्थांनी नोटीस दाखविण्याची मागणी केली. नोटीस पाहिल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. यावेळी ग्रामस्थांनी पीडीओंना चांगलेच धारेवर धरले. व ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता घेण्यात येणारी ग्रामसभा रद्द करण्यास भाग पाडले व पुढील ग्रामसभा ग्रामस्थांसमक्ष घेण्याची मागणी केली. वास्तविक पाहता गेल्या तीन वर्षाहून अधिक काळ येथील ग्रामसभा झालेली नाही. त्यामुळे ग्रामसभा घ्यावी अशी ग्रामस्थांची मागणी होती. तरीही ग्रामसभा घेण्यासाठी चालढकल करण्यात येत होती. रीतसर ग्रामसभा घेण्याचे सोडून ग्रामस्थांना अंधारात ठेवून ग्रामसभा तातडीने घेण्यामागचा उद्देश काय असाही प्रश्न ग्रामस्थानी उपस्थित केला आहे.
कचरा बकेटचे अद्याप वितरण नाहीच
ग्रामपंचायतीमार्फत ग्रामस्थांना कचरा टाकण्यासाठी म्हणून बकेटचे वितरण करण्यात येणार होते. वितरण करण्यापूर्वीच रक्कम संबंधित कंपनीला अदा करण्यात आली आहे. रक्कम अदा करून दोन वर्षे होऊन गेली तरी अद्याप बकेटचे वितरण करण्यात आलेले नाही. या मुद्यावरून ही ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका घेतली असून हे प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत.









