शेतकऱ्यांनी कंत्राटदाराला धरले धारेवर : यंत्रसामग्री हटविण्यास पाडले भाग : घटनास्थळी पोलिसांना पाचारण
बेळगाव : हलगा-मच्छे रस्त्याला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. असे असताना मंगळवारी रात्री या रस्त्यावर कंत्राटदाराने यंत्रसामग्री आणून उभी केली. बुधवारी सकाळी हा प्रकार शेतकऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी त्या कंत्राटदाराला जाब विचारला. कोणाच्या परवानगीने तुम्ही काम करत आहात? असा प्रश्न विचारण्यात आला. मात्र, कंत्राटदाराला उत्तर देता आले नाही. शेतकऱ्यांनी येथून तुमची यंत्रसामग्री तातडीने हटवा, असे सुनावले. यामुळे कंत्राटदाराने तेथून काढता पाय घेतला. हलगा-मच्छे बायपास रस्ता करण्यासाठी गेल्या 10 वर्षांपासून धडपड सुरू आहे. अनेकवेळा त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बुधवारी सकाळीही शेतकरी मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी तेथील यंत्रसामग्री हटविण्यासाठी कंत्राटदाराला सांगितले. उच्च न्यायालयामध्ये स्थगिती आहे. शेतकऱ्यांचा या रस्त्याला विरोध आहे, असे असताना तुम्ही या ठिकाणी आलाच कसे? न्यायालयाचा अवमान करण्याचा हा प्रकार आहे. तातडीने तो थांबवा, अन्यथा आत्मदहन करू, असा इशारा देण्यात आला.
शेतकऱ्यांचे उग्र रूप पाहून तातडीने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी शेतकरी नेते प्रकाश नायक यांनी हा रस्ता करण्यासाठी तुम्हाला कोणी पाठविले, तुमच्याकडे रितसर कागदपत्रे आहेत का? असा प्रश्न विचारला. सध्या शेतकरी विविध समस्यांना तोंड देत आहेत. दुष्काळ पडला आहे, पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. शेतकरी तणावामध्ये असताना अशाप्रकारे शेतकऱ्यांबरोबर तुम्ही वागत असाल तर उग्र आंदोलन हाती घेतल्याशिवाय पर्याय नाही. तेव्हा सारासार विचार करा, न्यायालयाचा अवमान करू नका, अन्यथा तुम्हाला महागात पडेल, असा सज्जड दम यावेळी त्यांनी दिला. हलगा-मच्छे बायपास करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न झाले. तो शेतकऱ्यांनी हाणून पडलेला आहे. दरम्यान या काळामध्ये शेतकऱ्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन याठिकाणी स्थगिती मिळविली आहे. असे असताना जर तुम्ही रस्ता करत असाल तर जेसीबीखाली आम्ही जीव देऊ, तेव्हा तुम्ही रोखला तर अंगावर पेट्रोल ओतून घेऊन आत्मदहन करू, असा इशारा दिला आहे. त्यानंतर कंत्राटदाराने आपली सर्व यंत्रसामग्री तेथून हटविली आहे.
हा तर न्यायालयाचा अवमान : अॅड. रवीकुमार गोकाककर
शेतकऱ्यांनी रितसर न्यायालयातून स्थगिती घेतली आहे. उच्च न्यायालयाने कायमस्वरुपी स्थगिती दिली असून या जागेमध्ये कोणालाही अतिक्रमण किंवा विकास करता येणार नाही. जर कोणी अशाप्रकारे दडपशाही करत रस्ता करण्याचा प्रयत्न करत असतील तर तो न्यायालयाचा अवमान ठरणार आहे. जर कोणीही अशाप्रकारे अवमान करत असतील तर त्याविरोधात पुन्हा शेतकऱ्यांच्यावतीने अवमान याचिका दाखल केली जाईल, असे ज्येष्ठ वकील अॅड. रवीकुमार गोकाककर यांनी स्पष्ट केले आहे.









