दोन्ही देशांमध्ये चर्चा, भागीदारीचे महत्व अधोरेखित
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत आणि अमेरिका यांचे संबंध अतिशय महत्वाचे असून सध्याच्या स्थितीत त्यांनी एकमेकांशी निकटचे सहकार्य करणे आवश्यक आहे, असे विधान अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री मार्को रुबिओ यांनी केले आहे. व्यापार, संरक्षण, औषधे आणि दुर्मिळ धातू ही चार क्षेत्रे हा या सहकार्याचा मुख्य आधार ठरु शकतो, असेश मत त्यांनी व्यक्त केले. या संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यात प्रत्यक्ष भेट घडविण्याचे प्रयत्न दोन्ही देशांकडून केले जात आहेत. सध्याचा व्यापारी तणाव निवळण्यासाठी ही भेट महत्वाची ठरु शकते, असे दोन्ही देशांच्या धोरणकर्त्यांची भूमिका असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
भारताचे व्यापार मंत्री पियुष गोयल यांची सध्या अमेरिकेच्या अधिकृत व्यापार प्रतिनिधींशी चर्चा होत आहे. भारत आणि अमेरिका यांच्यात व्यापार करार होऊ शकतो, असा विश्वास दोन्ही देशांना वाटत असल्याने नव्याने चर्चा केली जात आहे. सध्या असलेले गैरसमज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ट्रंप यांची भेट झाल्यास दूर होऊ शकतात आणि समीकरणे योग्य वळणारवर येऊ शकतात, असा विश्वास दोन्ही बाजूंच्या महत्वाच्या मध्यस्थांना वाटत असल्याने हे प्रयत्न होत आहेत.
युरोपियन महासंघ नेत्यांची भेट
सध्या अमेरिकेत संयुक्त राष्ट्रसंघाच्या सर्वसाधारण सभेची परिषद होत आहे. या परिषदेच्या निमित्ताने भारताचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस. जयशंकर तेथे गेले आहेत. त्यांनी अमेरिकेचे परराष्ट्र व्यवहार मंत्री रुबिओ यांच्याप्रमाणे युरोपियन महासंघाच्या महत्वाच्या नेत्यांशीही चर्चा केली आहे. पुढच्या वर्षाच्या प्रारंभी भारत आणि युरोपियन महासंघ यांच्यात महत्वाची परिषद होणार आहे. या परिषदेत सर्वंकष व्यापार करार करण्याच्या दृष्टीने चर्चा होणार आहे. या चर्चेतही, संरक्षण सामग्री पुरवठा, ऊर्जा पुरवठा, औषधे आणि व्यापार हेच चार मुद्दे कळीचे ठरणार आहेत. भारत आणि युरोप यांच्यात या चार मुद्द्यांवर सहकार्य झाल्यास अमेरिकेशी असलेल्या संबंधांचा समतोल राखणे भारतालाही शक्य होणार आहे.
तणाव निवळणे आवश्यक
भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार तणाव निवळण्याची आवश्यकता असून त्यानतंर बऱ्याच बाबी सुखावह होऊ शकतील, असा विश्वास भारत, अमेरिका आणि युरोपयिन नेत्यांना वाटतो. सध्या होत असलेली व्यापार चर्चा अखंड होत राहणे आणि ती यशस्वी होणे हे त्यासाठी महत्वाचे मानण्यात येते.









