वार्ताहर /धामणे
कित्तूर राणी चन्नम्मा यांचा पुतळा उभारण्याचा काही जणांचा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला. सदर प्रकार धामणे-कुरबरहट्टी येथे सोमवारी दुपारी घडला. यामुळे गावात तणाव निर्माण झाला असून, गावात शांतता भंग करण्याचाच त्यांचा प्रयत्न होता अशी नागरिकांतून चर्चा आहे. पण पोलीस अधिकाऱ्यांच्या सावधगिरीमुळे पुढील प्रकार टळला. सोमवार धामणे-कुरबरहट्टी रोडवर काही जणांनी कित्तूर राणी चन्नम्मा यांचा पुतळा उभारण्यासाठी काही साहित्य आणले. पण वेळीच तेथे पोलीस दाखल होऊन आणलेले साहित्य जप्त करून जमलेल्या काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुतळा उभारण्यासाठी साहित्य आणल्याची कुणकुण बंदोबस्तासाठी असलेल्या पोलीस शिपायाला लागली. यावेळी त्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांना तातडीने याची माहिती दिल्यानंतर तेथे आणखी पोलीस दाखल होऊन पुतळा उभारण्याचा बेत हाणून पाडून साहित्य जप्त केले. मात्र या सर्व प्रकारामुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे. संध्याकाळी तणावपूर्ण शांतता निर्माण झाली असून घटनास्थळी पोलीस बंदोबस्त आहे. धामणे ग्राम पंचायत अध्यक्ष पंडित पाटील आणि ग्राम पंचायत सदस्यांनी घटनास्थळी भेट देवून येथे उपस्थित पोलीस अधिकाऱ्यांशी घडलेल्या प्रकाराबद्दल चर्चा केली. पोलीस पुढील चौकशी करीत आहेत. रात्री उशिरापर्यंत कोणावरही गुन्हा दाखल केला नसल्याचे समजते.









