कुटुंबीय सावध झाल्याने दोघा भामट्यांचे पलायन
बेळगाव : वाढती गुन्हेगारी थोपविण्यासाठी गुन्हे प्रतिबंधक मासानिमित्त समाजात जनजागृती सुरू असतानाच बेळगाव शहर व उपनगरात चोऱ्या, घरफोड्या वाढल्या असून उपनगरातील नागरिकांना दहशतीखाली ठेवणाऱ्या गुन्हेगाराचा अद्याप थांगपत्ता लागला नाही. तोच भरदिवसा घरात घुसून किमती ऐवज पळविणाऱ्या जोडगोळीचा उपद्रव वाढला आहे. दोन दिवसांपूर्वी जोशी मळा, खासबाग परिसरात भरदिवसा घरात घुसलेल्या गुन्हेगाराला घरातील सदस्यांनी पिटाळून लावले असून वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे पोलीस अधिकारीही चक्रावले आहेत. उपनगरातील नागरिकांना पीडणाऱ्या आंतरराज्य गुन्हेगाराला पकडण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच मोटारसायकलवरून येऊन भरदिवसा घरात घुसणाऱ्या जोडगोळीचा उपद्रव वाढला आहे.
सोमवार दि. 25 डिसेंबर रोजी जोशी मळा, खासबाग परिसरात घडलेल्या घटनेने परिसरातील नागरिकही हैराण झाले आहेत. या परिसरातील एका घराचा दर्शनी दरवाजा उघडला होता. घरातील सर्व मंडळी आपापल्या कामात होते. त्याचवेळी दर्शनी दरवाजातून एक गुन्हेगार घरात गेला. त्याने थेट घरातील कपाट उघडण्याचा प्रयत्न केला. कपाट उघडताना आवाज येऊन घरातील महिलेचे कपाटाकडे लक्ष गेले. तिने लगेच आवाजाच्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी गुन्हेगार कपाट उघडण्याच्या प्रयत्नात होता. हा प्रकार पाहून महिलेने आरडाओरड केली. त्यामुळे कुटुंबातील इतर लोकही तिकडे धावले. आरडाओरड होताच गुन्हेगाराने कंपाऊंडवरून उडी टाकून तेथून पलायन केले. तोपयर्तिं आणखी एक गुन्हेगार घरापासून जवळच मोटारसायकलवर बसून होता. मोटारसायकल सुरूच ठेवली होती. कंपाऊंडवरून उडी टाकून आलेल्या भामट्याला घेऊन ते दोघे सुसाट वेगाने तेथून पसार झाले. कुटुंबीयांची आरडाओरड ऐकून परिसरातील नागरिकही घटनास्थळी जमा झाले.
आंतरराज्य गुन्हेगाराचा पोबारा
उपनगरातील घरांनाच गुन्हेगारांनी लक्ष्य बनविले आहे. एका आंतरराज्य गुन्हेगाराने तर अक्षरश: धुमाकूळच घातला आहे. त्याला जाळ्यात अडकविण्यासाठी संपूर्ण पोलीस यंत्रणा कामाला लागली असून सध्या त्याने बेळगाव सोडल्याची माहिती मिळाली आहे. आता भरदिवसा घरात घुसून तिजोरीला हात घालणाऱ्या जोडगोळीविषयीही माहिती मिळविण्याचे काम पोलिसांनी सुरू केले आहे.









