शेजाऱ्यांनी हटकताच भिंतीवरून उडी टाकून पलायन
प्रतिनिधी/ बेळगाव
भरदिवसा चोरीचा प्रयत्न करणाऱ्या एका महिलेची छबी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. शुक्रवार दि. 31 मे रोजी सकाळी 11.15 वाजण्याच्या सुमारास शिवबसवनगर परिसरात ही घटना घडली असून शेजाऱ्यांना पाहताच त्या महिलेने भिंतीवरून उडी टाकून तेथून पळ काढल्याचे उघडकीस आले आहे.
हा प्रकार उघडकीस आल्यानंतर माळमारुतीचे पोलीस निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची, उपनिरीक्षक श्रीशैल हुलगेरी व त्यांच्या सहकाऱ्यांनी शिवबसवनगर परिसरात धाव घेतली. घरफोडीचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचा शोध घेण्यासाठी परिसरात तपास मोहीम राबविण्यात आली.
चेहऱ्याला कपडा बांधून ही महिला चोरीसाठी आली होती. कुठे गेट उघडून तर आणखी कुठे भिंतीवरून उडी टाकून ती घरात घुसत होती. वेळीच हा प्रकार नागरिकांच्या लक्षात आल्याने तिला हटकले. पोलीस दाखल होण्याआधीच या महिलेने तेथून पळ काढला आहे. यापूर्वी हुबळी-धारवाड परिसरातही अशाच महिलेची छबी चोरी करताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती.
फुटेजवरून लक्षात घेता महिलेसारखा पोशाख असला तरी ती तृतीयपंथी असल्याचा संशय बळावतो. त्यामुळेच पोलिसांनी या संशयिताच्या अटकेसाठी नागरिकांची मदत घेण्याचे ठरविले आहे. अशा व्यक्ती कुठल्याही परिसरात दिसून आल्यास 112 क्रमांकावर किंवा 9480804107 मोबाईल क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.









