सातारा :
सातारा शहरात प्रवीण भोसले यांचे ज्वेलर्सचे दुकान आहे. त्या ज्वेलर्समध्ये 30 जुलै रोजी रात्री दोन जण चोरीचा प्रयत्न करत असल्याचे स्थानिकांच्या निदर्शनास आले. संशयित धारधार शस्त्र घेवून स्थानिकांच्यावर अंगावर धावू लागले. यावेळी स्थानिकांनी दोघांना बेदम मारहाण करुन शाहुपूरी पोलिसांच्या हवाली केले. सिद्धांत जयवंत साळुंखे (रा. तामजाईनगर), शुभम दीपक इंगवले (रा. किडगाव) अशी त्या दोघांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी, ऋषिकेश तिताडे याने दिलेल्या फिर्यादीनुसार साताऱ्यात 30 जुलैच्या मध्यरात्री जुनी भाजी मंडईत प्रवीण भोसले यांच्या सोन्या चांदीच्या दुकानात चोरी करण्याच्या उद्देशाने दोन जण दिसले. त्यांच्याकडे धारधार शस्त्रs होती. त्या दोघांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यातील सिद्धांतने हातातले शस्त्र काढले आणि तो सरळ ऋषिकेश तिताडेच्या अंगावर गेला. त्याने ऋषिकेशच्या कानावर, गालावर, मानेवर मारुन जखमी केले.
तसेच शुभम पाना घेवुन ऋषिकेशच्या मदतीला आलेल्या विशाल बावणेच्या अंगावर धावला. यामुळे त्या परिसरात इतर लोक जागे झाले. यावेळी मोठा गलका सुरु झाला. ऋषिकेश आणि विशाल यांना वाचवण्यासाठी स्थानिकांनी सिद्धांत आणि शुभम या दोघांना काठ्यांनी मारहाण केली. झालेल्या मारहाणीत दोघेही जखमी झाले. दोघांना शाहुपूरी पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले असून गुन्हा दाखल केला आहे. याचा तपास शाहुपूरी पोलीस ठाण्याचे पीएसआय डेरे हे करत आहेत.








