पुणे / वार्ताहर :
पुण्याच्या कात्रज परिसरात एका व्यावसायिकाची मोटार आडवून चाकूच्या धाकाने त्याला मारहाण करत अपहरणाचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, व्यावसायिक त्यांच्या हातून निसटला. त्यानंतर व्हॉटसॲप कॉलद्वारे या व्यावसायिकाकडे 50 लाखांची खंडणी मागितल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.
पवन मधुकर कांबळे (वय 22,), कृष्णा भिमराव भाबट (9, धायरी) आणि सौरभ संजय बनसोडे (25) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी अभिजीत कृष्णा भोळे (35) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. 6 ते 12 मे दरम्यान कात्रज परिसरात ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार भोळे यांचा ट्रान्सफॉर्मर बनविण्याचा व्यवसाय असून ते भारती विद्यापीठ परिसरात राहतात. काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडे कामाच्या बहाण्याने तीन जण आले. त्यांनी भोळे यांच्याशी संबंधित सर्व माहिती गोळा केली. त्यानंतर साथीदारांच्या मदतीने त्यांनी भोळे यांच्या अपहरणाचा डाव आखला. 6 मे रोजी कात्रज महामार्गावर त्यांनी भोळे यांची मोटार आडवून त्यांना चाकूचा धाक दाखवून अपहरणाचा प्रयत्न केला. यावेळी भोळे यांना मारहाणही करण्यात आली. मात्र, भोळे त्यांच्या हातून निसटले. त्यानंतर आरोपींनी 12 मे रोजी दोन व्हॉट्सअपद्वारे कॉल करुन भोळे यांना 50 लाखांची खंडणी मागितली. पैसे न दिल्यास कुटूंबाला व तुम्हाला जीवे मारू अशी धमकीही दिली. त्यानंतर पोलिसांनी तिघांना अटक केली. भारती विद्यापीठ पोलीस अधिक तपास करत आहेत.









