सायबर गुन्हेगारांकडून फोनद्वारे संपर्क : मुलगा बलात्कार प्रकरणात अडकल्याचा बनाव
बेळगाव : डिजिटल अरेस्टचे प्रकार सुरूच आहेत. ‘तुमचा मुलगा बलात्कार प्रकरणात अडकला आहे. सध्या एकूण तीन मुले आमच्या ताब्यात आहेत. त्यांच्या सुटकेसाठी सुरुवातीला प्रत्येकी 50 हजार रुपये आमच्या बँक खात्यावर पाठवा. अन्यथा त्याला पोलिसांकडे सोपवू’ असे सांगत विजयनगर-हिंडलगा येथील एका विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांना ठकवण्याचा प्रयत्न झाला. कुटुंबीयांच्या सावधगिरीमुळे हा प्रयत्न हाणून पाडला. बुधवारी दुपारी व्हीटीयुमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याच्या कुटुंबियांना व्हॉट्सअप कॉल आला. त्या विद्यार्थ्याचे नाव घेत ‘तुम्ही त्याचे कुटुंबीय आहात का?’ अशी विचारणा करण्यात आली. ‘सध्या तीन विद्यार्थी आमच्या ताब्यात आहेत. ते तिघेही बलात्कार प्रकरणात सापडले आहेत’ असे सांगण्यात आले.
त्यावर त्या विद्यार्थ्याच्या कुटुंबियांनी ‘आमचा मुलगा
कॉलेजला गेला आहे. सध्या त्याची परीक्षा सुरू आहे. तो तसा करणारा नाही’ असे सांगितले. ‘दोन तरुणींवर बलात्कार झाला आहे. या प्रकरणी तीन मुले आमच्या ताब्यात आहेत. यामध्ये तुमच्या मुलाचाही समावेश आहे. त्या तरुणींचे कुटुंबीय मीडियाला घेऊन पोलीस स्थानकात बसले आहेत. त्यांनी एफआयआर दाखल करण्याआधी आम्ही सांगतो त्या बँक खात्यावर पैसे पाठवा’ असे सांगितले.
अचानक आलेल्या या फोन
कॉलमुळे कुटुंबियांना धक्का बसला. त्यांना खात्री पटावी, यासाठी एका मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकवला. ‘तुमचा मुलगा रडतो आहे. लवकर पैसे पाठवा व त्याला सोडवून घ्या’ असे गुन्हेगारांनी सांगितले. ज्या क्रमांकावरून फोन आला, तो पाकिस्तानमधला होता. ज्या क्रमांकावर पैसे जमा करा असे सांगितले गेले, तो क्रमांक भारतातील होता. व्हीटीयुमध्ये परीक्षा सुरू होती. लगेच कुटुंबियांनी गुन्हे तपास विभागाचे एसीपी सदाशिव कट्टीमनी यांच्याशी संपर्क साधला. तातडीने पोलीस व्हीटीयुला पोहोचले. तो विद्यार्थी परीक्षा लिहीत होता. याची खात्री पटताच गुन्हेगारांना चांगलेच सुनावले. ‘आमच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत तुम्ही मोबाईल सोडून हलायचे नाही’ अशी तंबी गुन्हेगारांनी दिली होती. विद्यार्थी सुखरुप असल्याचे समजताच कुटुंबीयांचा जीव भांड्यात पडला. त्यांनी गुन्हेगारांना खडसावताच पलीकडून फोन बंद करण्यात आला. कुटुंबियांच्या सावधगिरीमुळे फसवणुकीचा प्रकार टळला.









