सेवादाराच्या प्रसंगावधानामुळे जीव वाचला, हल्लेखोर दहशतवाद्याला जागीच अटक
वृत्तसंस्था / अमृतसर
पंजाबचे माजी मुख्यमंत्री आणि शिरोमणी अकाली दलाचे नेते सुखबीरसिंग बादल यांच्या हत्येचा प्रयत्न शीखांचे पवित्र धर्मस्थळ असणाऱ्या सुवर्ण मंदिरात करण्यात आला आहे. मात्र, एका सेवादाराच्या प्रसंगावधानामुळे बादल या प्रसंगातून वाचले आहेत. हल्लेखोर दहशतवाद्याला जागीच ताब्यात घेण्यात आले असून त्याची चौकशी होत आहे. ही घटना बुधवारी सकाळी घडली.
हल्लेखोराचे नाव नारायणसिंग चौरा असल्याची माहिती देण्यात आली आहे. तो बब्बर खालसा या पहिल्या खलिस्तानवादी दहशतवादी संघटनेचा माजी हस्तक आहे. सुखबीरसिंग बादल यांना अकाल तख्ताने मंगळवारी त्यांनी सत्ताकाळात केलेल्या काही ‘चुकां’संबंधी शिक्षा दिली होती. ती शिक्षा भोगण्यासाठी ते सुवर्ण मंदिरात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून गोळी झाडण्याचा प्रयत्न केला. तथापि, बादल यांच्यानजीक उभ्या असणाऱ्या अन्य सेवादाराने हल्लेखोराचा हात पकडल्याने त्याचा नेम चुकला आणि त्याने झाडलेली गोळी बादल यांच्या मागच्या बाजूस असणाऱ्या भिंतीला लागली. त्यानंतर सुवर्ण मंदिरातील सुरक्षा सैनिकांनी त्वरित हल्लेखोराला घेरले आणि त्याला नि:शस्त्र केले. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात येऊन कालांतराने रितसर अटक करण्यात आली.
सेवादार नागरी वेषातील पोलीस
बादल यांचा जीव वाचविणारा ‘सेवादार’ हा नागरी वेषातील पोलीसच होता, असे नंतर स्पष्ट करण्यात आले. हल्लेखोर आता पोलिसांच्या ताब्यात असून त्याची चौकशी करण्यात येत आहे. बादल यांच्या हत्येच्या प्रयत्नामागे व्यापक कारस्थान होते काय, याची चौकशी केली जात आहे. तसेच हल्लेखोर नारायणसिंग चौरा याचीही पार्श्वभूमी तपासली जात आहे. त्याचे कोणाशी संबंध आहेत, याची माहिती मिळाल्यावर या प्रकरणावर अधिक प्रकाश पडेल. हा दहशतवादी हल्ला आहे की व्यक्तिगत कारणांमुळे आहे, हे सखोल तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.
मंगळवारपासूनच मागावर
हल्लेखोर नारायणसिंग चौरा याने मंगळवारपासूनच बादल यांच्यावर पाळत ठेवली होती, असे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले. मंगळवार सकाळपासूनच त्याला सुवर्ण मंदिर परिसरात पाहिले गेले होते. बुधवारी सकाळी त्याने प्रथम ‘गुरु ग्रंथ साहेब’ला वंदन केले. त्यानंतर तो बादल यांच्या जवळ गेला आणि त्याने त्यांच्यावर नेम धरण्याचा प्रयत्न केला. तथापि, त्याचा हात पकडला गेल्याने त्याचा प्रयत्न फसला.
मंगळवारपासून सेवा
सुखबीरसिंग बादल हे गेल्या मंगळवारपासून सुवर्ण मंदिराच्या परिसरात शिक्षा भोगत आहेत. त्यांच्या सत्ताकाळात त्यांनी डेरा सच्चा सौदा या पंथाचे प्रमुख रामरहिम यांना एका प्रकरणात सोडलेले होते. ही चूक त्यांनी केल्याने त्यांना अकाल तख्ताने शिक्षा दिली आहे. ती शिक्षा ते मंगळवारपासून भोगत आहेत. सुवर्ण मंदिरातील स्वच्छतागृहांची स्वच्छता करणे, भाविकांची पादत्राणे स्वच्छ करणे आदी कामे त्यांना शिक्षेच्या काळात करावी लागत आहेत. याच वेळी हा हल्ला झाल्याने सुवर्ण मंदिर परिसर आणि पंजाबमध्ये एकच खळखळ उडाली आहे.
सुरक्षा व्यवस्था बळकट
सुरक्षेतील त्रुटीमुळे हा हल्ला झालेला नाही. सुवर्ण मंदिरात बळकट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. ती कडक असल्यानेच बादल कोणतीही इजा न होता सुखरुप वाचले आहेत. त्यांनाही पुरेशी सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. तरी अचानक हा प्रकार घडला, असे प्रतिपादन पोलीस अधिकाऱ्यांनी केले. नारायणसिंग चौरा हा सुवर्ण मंदिरात एकटाच आला होता. त्याच्या साहाय्यकांचा शोध घेण्याचा प्रयत्नही करण्यात येत आहे. येत्या चार-पाच दिवसांमध्ये चित्र स्पष्ट होईल, अशी माहिती अमृतसर पोलीस आयुक्त भुल्लर यांनी नंतर दिली.
नारायणसिंग चौरा कोण…
सुखबीरसिंग बादल यांच्या हत्येचा प्रयत्न करणारा नारायणसिंग चौरा हा खलिस्तानी दहशतवादी आहे. तो बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा हस्तक होता. 2004 मध्ये त्याने बुरैल येथील कारागृह फोडून चार खलिस्तानवादी दहशतवाद्यांनी पलायन केले होते. त्यांनी 94 फूट लांबीचे भुयार खोदून कारागृहातून पलायन केले अशी माहिती दिली गेली होती. या पलायनाला चौरा याने साहाय्य केल्याचा आरोप आहे. मात्र, या प्रकरणात आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली होती. यावेळी चौरा याला अटक करण्यात येऊन त्याला प्रदीर्घ काळ कारावासात घालवावा लागला होता. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. या घडामोडींपूर्वी 1984 मध्ये तो पाकिस्तानात जाऊन प्रशिक्षण घेऊन आला होता, अशीही माहिती त्याच्यासंबंधी देण्यात आली आहे.
कारण अद्याप अज्ञात…
ड सुखबीरसिंग बादल यांच्या हत्येच्या प्रयत्नाचे कारण अद्याप अस्पष्ट
ड हल्लेखोर नारायणसिंग चौरा खलिस्तानवादी संघटनेशी होता संबंधित
ड चौरा याच्या साहाय्यकांचा शोध सुरु, लवकरच मोठा पर्दाफाश होणार









