इचलकरंजी प्रतिनिधी
शहरानजीकच्या कबनूर येथे सुरू असलेल्या उरुसाच्या गर्दीचा फायदा घेत बनावट नोटा खपवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका कुटुंबातील तिघांना रंगेहाथ पकडण्यात नागरिकांना यश आले. राजन नामदेव काळोखे (वय 29), पुतळाबाई नामदेव काळोखे (वय 51), धनश्री राजन काळोखे (वय 22) अशी संशयितांची नावे असून त्यांना शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधिन केले. त्यांच्याकडील 23 हजार 500 रुपये दराच्या 500, 200 व 50 रुपयाच्या बनावट नोटा जप्त केल्या.
याबाबतची माहिती अशी, येथील मुख्य बसस्थानक ते शाहु पुतळा मार्गावर लहान मुलांसह आलेल्या धनश्री काळोखे आणि त्यांची सासु पुतळाबाई या दोघींनी फळे खरेदी करून 500 रुपयांची नोट दिली. त्यांनी जवळच असलेल्या चहाच्या टपरीवरही 500 रुपयांच्या सुट्ट्याची मागणी केली. त्यामुळे काही संशय आल्याने नागरिकांनी त्यांच्यावर पाळत ठेवली. त्या चारचाकीतून पुढे कबनूरकडे निघाल्या. त्यांचा पाठलाग करून चारचाकी गाडी अडवली असता त्यांच्याकडे बनावट नोटा असल्याचे निदर्शनास आले. बनावट नोटा गाडीच्या शिटखाली लपवण्याचाही प्रयत्न करत होत्या. त्यामुळे नागरीकांनी धनश्री, तिचा पती राजन आणि पुतळाबाई अशा तिघांसह चारचाकी गाडी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात आणली. हे तिघेही कुर्डुवाडी (ता. सोलापूर) येथील असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी बनावट नोटा तपासणीसाठी पाठवल्या. तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मोबाईलसह मुद्देमालही जप्त केला. याप्रकरणी सखोल चौकशी सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती पोलीस निरीक्षक सत्यवान हाके यांनी सांगितली.