महिलेने आमदार पाटील यांना मागितली 10 लाखांची खंडणी
कोल्हापूर : चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांना नेहा पवार नावाच्या महिलेने हनीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली आहे. या महिलेने आमदार पाटील यांना वारंवार व्हॉट्स अॅप कॉल करून त्यांना अश्लील छायाचित्रे पाठवून १० लाख रुपयांची मागणी केली आहे.
याप्रकरणी आमदार पाटील यांनी ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. पोलिसांनी या प्रकरणी नेहा पवार नावाच्या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल केला. १९ सप्टेंबर २०२५ पासून आमदार पाटील यांना या महिलेचे पुन्हा कॉल सुरू झाले. तिने पाटील यांना धमकी देऊन १० लाखांची मागणी केली.
तसेच पाटील यांना एका व्यक्तीचे बँक खाते क्रमांक, आधारकार्ड पाठवून त्याचे वडील आजारी आहेत, त्यांना पैशांची गरज आहे असे सांगून पैशांची मागणी केली. आमदार पाटील यांनी याप्रकरणी चितळसर पोलीस ठाण्यात महिलेविरुद्ध तक्रार पवार नावाच्या महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील हिरानंदानी येथे राहणारे शिवाजी पाटील हे अपक्ष आमदार म्हणून चंदगड तालुक्यातून निवडून आले आहेत. निवडणुकीपूर्वी एका अनोळखी क्रमांकावरून त्यांना व्हॉट्सअॅप कॉल आला होता, परंतु आमदार पाटील यांनी अनोळखी क्रमांक असल्यामुळे तो उचलला नाही. परंतु त्याच क्रमांकावरून वारंवार कॉल येऊ लागल्याने पाटील यांनी तो कॉल घेतला होता. फोनवर एका महिलेचा आवाज आला व मी तुम्हाला ओळखते, तुमच्यासोबत मैत्री करायची आहे, मी खूप सुंदर आहे, तुम्हाला हवं ते द्यायला तयार आहे, असे ती आमदार पाटील यांना म्हणाली.
पाटील यांनी कॉल कट करून त्याकडे दुर्लक्ष केले. परंतु ती वारंवार कॉल करू लागल्यामुळे अखेर पाटील यांनी तिचा मोबाईल क्रमांक ब्लॉक केला. आमदार पाटील हे निवडणुकीच्या रणधुमाळीत असताना त्यांना दुसऱ्या क्रमांकावरून कॉल आणि मेसेज येऊ लागले. पाटील यांनी तो कॉल उचलला. महिलेचा आवाज आल्याने त्यांनी तिचे नाव व पत्ता विचारला असता तिने स्वतःचे नाव नेहा पवार सांगून पत्ता देण्यास नकार दिला.
आमदार पाटील यांना कॉल करून मला तुमच्याशी मैत्री करायची आहे. तसेच तुम्हाला हवे ते देणार असे बोलून अश्लील चॅट करू लागली. आमदार पाटील प्रचारात असताना नेहा पवार नावाची महिला दररोज पाटील यांच्या मोबाईलवरील व्हॉट्सअॅपवर अश्लील छायाचित्रे पाठवू लागली. पाटील यांनी तिला नकार दिला असता तिने त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची धमकी दिली होती.








