ऊस दरावरून शेतकऱ्यांचा संताप
कोल्हापूर : कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ताफ्यावर अज्ञात शेतकऱ्यांनी ऊसाच्या कांडया फेकण्याचा प्रयत्न केला. या घटनेमुळे पोलीसांची चांगलीच धावपळ उडाली. तसेच पुणे- बंगळूर महामार्गावर वाहतूक विस्कळित झाली..
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एका कार्यक्रमासाठी बुधवारी सकाळी कोल्हापूरात आले होते. पोलीस मैदान येथील कार्यक्रम संपल्यावर त्यांच्या वाहनांचाः ताफा दुपारी उजळाईवाडी विमानतळाकडे निघाला होता. पुणे-बेंगलोर महामार्गावरील एका भुयारी मार्गाखाली मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा असला असता अचानक अज्ञात शेतकऱ्यांनी त्यांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांडया फेकण्याचा प्रयत्न झाला. अचानक झालेल्या या घटनेमुळे याठिकाणी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलीसांची धावपळ उडाली. रस्त्यावर पडलेल्या ऊसाच्या कांड्या पोलीसांनी गोळया केल्या. मात्र यामुळे या मार्गावरील वाहतूक कोलमडली.
या घटनेमुळे कोल्हापूर जिल्हयातील शेतकऱ्यांचा ऊस दराच्या प्रश्नावरुन संताप उफाळून आला आहे. ऊस दराच्या प्रश्नावरुन दोन दिवसापूर्वीच पालकमंत्री प्रकाश आबीटकर यांच्या उपस्थितीत शेतकरी संघटना, ऊस उत्पादक आणि साखर कारखानदारांची बैठक झाली होती. या बैठकीत ठोस तोडगा निघाला नाही.
काही कारखान्यांनी मागील हंगामाची एफआरपी थकवली आहे. त्यांच्यावर अद्याप कारवाई झाली नाही. हंगामातील आरएसएफ नुसार २०० रुपये दिले नाहीत यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप आहे. या घटनेचे जिल्ह्यात पडसाद उमटत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या वाहनांच्या ताफ्यावर ऊसाच्या कांडया फेकण्याचा प्रयत्न त्याचाच भाग असल्याचे बोलले जात आहे.








