दुकानदाराने आरडाओरड केल्याने दोघे भामटे पसार : अथणी शहरातील भरदुपारची घटना
वार्ताहर/अथणी
भरदिवसा ज्वेलरी दुकानात घुसून पिस्तूलच्या धाकाने दुकान लुटण्याचा सिनेस्टाईल प्रयत्न झाल्याची घटना अथणी शहरात घडली आहे. मंगळवारी दुपारी घडलेल्या या घटनेने व्यापाऱ्यांत खळबळ उडाली. संशयितांचा हा प्रयत्न फसला असला तरी ते पळून गेले आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अथणी शहरात त्रिमूर्ती नावाचे महेश पोतदार यांच्या मालकीचे सोने-चांदीचे दुकान आहे. या दुकानात दुपारी एका दुचाकीस्वाराने हेल्मेट घालून प्रवेश केला. त्याच्यासोबत आणखी एकजण टोपी घातलेला सहकारीही होता. दुकानात प्रवेश करताच त्यातील हेल्मेट घातलेल्या संशयिताने पिस्तूल काढून दुकानदाराला घाबरविण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर दुकानाचे काऊंटर उघडून दोघेही आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करत असताना दुसऱ्या बाजूने दुकानदाराने काऊंटरवरून उडी मारून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी संशयित दोघांपैकी टोपीवाल्याने दुकान मालकावर झडप घालून त्याला पकडून पुन्हा दुकानात आणले. त्यानंतर त्याचे तोंड दाबून त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करतानाही दुकानदाराने हिसडा मारून ओरडण्याचा प्रयत्न केला. यावेळी दुकानदाराच्या आवाजामुळे शेजारील नागरिक येतील या भीतीने दोघाही संशयितांनी दुकानातून पळ काढला. त्यानंतर ते दोघेही दुचाकीवरून सहजपणे निघून गेले. हे सर्व दृश सीसीटीव्हीत कैद झाले आहे.
सहकाऱ्याला घेऊन पोबारा
या घटनेची माहिती पोलिसांना दिल्यानंतर उपनिरीक्षक गिरिमल उप्पार व सहकाऱ्यांनी धाव घेऊन माहिती घेतली. विविध ठिकाणी सीसीटीव्ही तपासण्यासाठी व संशयितांचा शोध घेण्यासाठी पथके तयार करून पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दोघेही संशयित दुकानातून बाहेर आल्यावर टोपीवाल्याने नंबर नसलेली दुचाकी घेऊन मागे हेल्मेटवाल्या सहकाऱ्याला घेऊन पोबारा केल्याचे दिसून आले. बाजारपेठेतून हे दोघेही सहजपणे निघून गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. नियमित लोकांची वर्दळ असल्याने व त्यांच्यामागे कोणीही धावले नसल्याने ते चोर असल्याचा संशय रस्त्यावरील लोकांना आलेला नाही.









