शेतकऱयांनी बुडा अधिकाऱयांना पिटाळले : जमीन न देण्यावर शेतकरी ठाम
प्रतिनिधी / बेळगाव
कणबर्गी येथील जमीन बुडा कब्जात घेण्यासाठी गुरुवारी जेसीबीसह दाखल झाले होते. मात्र शेतकऱयांनी त्याला तीव्र विरोध करून अधिकाऱयांना तसेच जेसीबीधारकाला पिटाळून लावले. अचानकपणे सात-बारावरील नावे कमी करून कब्जा घेण्याचा प्रयत्न बुडाने केल्याने शेतकऱयांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रामतीर्थनगर येथील शेतकरी सिद्राय निंगाप्पा कोलकार (मयत), विरुपाक्षी यशवंत कोलकार (मयत), सदाशिव यशवंत कोलकार (मयत), महादेव यशवंत कोलकार, अप्पय्या यशवंत कोलकार, निंगाप्पा दत्तात्रय कोलकार यांच्या मालकीची जमीन कब्जात घेण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. 1994 ला बुडाने नोटीस दिली होती. त्यानंतर त्याला विरोध करण्यात आला होता. मात्र आता अचानक पुन्हा ही जागा कब्जात घेण्याचा प्रयत्न सुरू केल्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
रामतीर्थनगर येथील सर्व्हे क्रमांक 562/1ए-9 गुंठे, 562/2ए-20 गुंठे, 562/2बी-19 गुंठे स्कीम क्रमांक 34, 35, 43, 43-ए राबविण्यासाठी त्यावेळी प्रयत्न करण्यात आले होते. या शेतकऱयांची एकूण 1 एकर 8 गुंठे जमीन असून ती जमीन शेतकऱयांच्या कब्जातच असताना त्या जमिनीच्या सातबारा उताऱयावर मार्च 13 तारखेपर्यंत शेतकऱयांचीच नावे होती. मात्र त्यानंतर बुडाने नाव चढवून घेतले आहे. आता ही जागा कब्जात घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
गुरुवारी त्या ठिकाणी जेसीबीसह अधिकारी जागा कब्जात घेण्यासाठी गेले होते. मात्र शेतकऱयांनी त्यांना पिटाळून लावले. बुडा आयुक्त प्रितम नसलापुरे यांच्यासह इतर अधिकारी गेले होते. मात्र शेतकऱयांनी आम्ही जमीन देणार नाही. नोटीस देऊन 32 वर्षे उलटली तरी त्यावेळी आम्ही तक्रार दिली आहे, असे सांगितले. मात्र बुडा आयुक्तांनी तुमच्या वडिलांनी काही रक्कम घेतल्या संदर्भातील बॉण्ड दाखविले. मात्र त्याला आमची संमती नाही म्हणून शेतकऱयांनी त्याला विरोध केला आहे.
कणबर्गी येथील शेतकऱयांच्या जमिनी ताब्यात घेण्यासाठी बुडाचे अधिकारी आल्याचे कळताच शेतकरी त्या ठिकाणी गेले. सदर जमीन ही वसतिगृहासाठी आम्ही घेतली आहे, असे सुरूवातीला सांगण्यात आले. मात्र ही आमच्या मालकीची जमीन असून आमची कोणतीच संमती नाही. तेंक्हा याठिकाणी तुम्ही थांबू नये, अन्यथा तीव्र आंदोलन करु, असा इशारा शेतकऱयांनी दिला. त्यामुळे अधिकाऱयांनी तेथून काढतापाय घेतला आहे.









