राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प व्यवस्थापकांना संतप्त शेतकऱ्यांनी धारेवर धरले : भरपाई द्या मगच टोलवसुली करण्याची मागणी, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा
खानापूर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून बुधवारी पुन्हा टोल आकारणीचा प्रयत्न हाणून पाडला. मात्र राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा हेकेखोरपणा स्पष्टपणे दिसून येत आहे. कोणत्याही परिस्थितीत टोल आकारणी सुरू करणारच, अशी भूमिका राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी घेतली आहे. खानापूर परिसरातील शेतकऱ्यांनी बुधवारी आंदोलन करून टोल आकारणी थांबवली. त्यामुळे त्वरित घटनास्थळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक भुवनेश कुमार यांनी भेट देवून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र शेतकऱ्यांनी जोपर्यंत नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत टोल आकारणी करण्यास देणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे टोल आकारणीवरून वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. बेळगाव-गोवा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या माध्यमातून बेळगाव-गोवा (पणजी) हा चौपदरी रस्ता बनवण्यात आला. बेळगाव ते खानापूर हा रस्ता तयार झाला आहे. मात्र खानापूर ते गोवा हद्द तसेच झाडशहापूर आणि मच्छे या ठिकाणी रस्त्याचे काम अर्धवट आहे. तसेच काही ठिकाणी रस्ते अद्याप तयार केलेले नाहीत. मात्र महामार्ग प्राधिकरणाने होनकल ते झाडशहापूर या 16 कि. मी. तयार रस्त्यावर गणेबैल येथे टोलनाका उभारुन टोलवसुली सुरू करण्याचे नियोजन केले आहे.
शेतकऱ्यांची जोरदार निदर्शने
मंगळवारपासून टोल आकारणी करण्यात येणार होती. मात्र शेतकऱ्यांसह नागरिक टोल आकारणी विरोधात आक्रमक झाले आहेत. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत टोल आकारणी करू नये, तसेच महामार्गात शेती गेलेल्या शेतकऱ्यांना भरपाई मिळाल्यानंतर टोल आकारणी करावी, अशी मागणी लावून धरली. मात्र प्राधिकरणाने टोल आकारणीचा निर्णय घेऊन टोलवसुली सुरू केली आहे. त्यामुळे वाद निर्माण झाला. शेतकऱ्यांनी तसेच नागरिकांनी बुधवारी सकाळी 9 वा. गणेबैल येथे टोल आकारणी विरोधात जोरदार निदर्शने करत टोल आकारणी थांबवली. टोलवसुली थांबवण्यात आल्याने महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक भुवनेश कुमार हे घटनास्थळी दाखल होऊन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली. आणि टोल आकारणीला सहकार्य करावे, असे आवाहन केले. मात्र शेतकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने त्यांनी तेथून काढता पाय घेतला. यानंतर रयत संघाचे नेते प्रकाश नाईक यांनी जिल्हाधिकाऱ्यांशी मोबाईलवरून संपर्क साधून शेतकऱ्यांची व्यथा त्यांना सांगितली. तसेच शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळत नाही तोपर्यंत टोल आकारणीला विरोध राहणार, असे स्पष्ट सुनावले.
प्राधिकरणाने आडमुठे धोरण सोडावे
यावेळी प्रकाश नाईक म्हणाले, महामार्ग प्राधिकरणाने आपले आडमुठे धोरण बाजूला ठेवून शेतकऱ्यांची नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच टोल आकारणीसाठी लागणाऱ्या मनुष्यबळाच्या ठिकाणी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, ज्या शेतकऱ्यांची जमीन रस्त्यात गेली आहे. त्यांना सेवेत सामावून घ्यावे. जर महामार्ग प्राधिकरणाने आपला आडमुठेपणा कायम ठेवल्यास आम्ही उग्र आंदोलन करू, यानंतर जी परिस्थिती निर्माण होईल त्या परिस्थितीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण जबाबदार राहील, असा इशारा दिला.
स्थानिकांना सेवेत सामावून घ्या
माजी आमदार दिगंबर पाटील म्हणाले, महामार्ग प्राधिकरणाने प्रथम रस्त्याचे काम पूर्ण करावे, तसेच स्थानिकांना सेवेत सामावून घ्यावे, आणि बेळगावला दररोज जाणाऱ्या वाहनांना कायमस्वरुपी सूट द्यावी. शेतकऱ्यांसाठी कार्यरत असणारे कल्लाप्पा घाडी म्हणाले, जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने याबाबत निर्णय घेऊन नुकसानभरपाईचे आदेश शेतकऱ्यांना द्यावेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर झालेला अन्याय दूर होईल. याबाबत महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र शासनाच्या निर्देशानुसार आपणही टोल आकारणी करणार असल्याचे त्यांनी चर्चेदरम्यान स्पष्ट केले. यावेळी गुंजी, होनकल, करंबळ गावातील शेतकरी मोठ्या प्रमाणात आंदोलनात सहभागी झाले होते. याप्रसंगी समितीचे गोपाळराव देसाई, सचिव आबासाहेब दळवी, ज्येष्ठ नेते प्रकाश चव्हाण, पुंडलिक पाटील, संभाजी पाटील यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भरपाई देण्यासाठी प्रयत्नशील!
शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात तातडीने निर्णय घेऊ, यासाठी दोन-तीन महिन्याचा कालावधी लागणार आहे. तसेच प्राधिकरणाने माझ्यावरही आक्षेप घेत 150 कोटीचे नुकसान महामार्ग प्राधिकरणाला झाला असल्याने माझ्यावरच प्राधिकरणाकडून दबाव आणण्यात येत असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र आपण शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.a









