पती, सासू-सासऱ्याची निर्दोष मुक्तता : जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
बेळगाव : हुंड्यासाठी छळ करून पत्नीला विष पाजून जीवे मारण्याच्या आरोपातून पती, सासू व सासऱ्याची निर्दोष मुक्तता केली आहे. येथील सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एच. एस. मंजुनाथ यांनी हा निकाल दिला आहे. फिर्यादी मीनाक्षी उद्धप्पा बबलेन्नावर हिने गोकाक ग्रामीण पोलीस स्थानकात दाखल केलेल्या तक्रारीवरून आरोपींवर भादंवि कलम 498, 307, 506, 341, 201 व हुंडा प्रतिबंधक अधिनियमप्रमाणे गुन्हा नोंदविला होता. गोकाक पोलिसांकडून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी मीनाक्षी हिचा आरोपी क्र. 1 उद्धप्पा बबलेन्नावर याच्याशी 2019 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मीनाक्षीचा पती पोलीस कॉन्स्टेबल असून तो बेंगळूर येथे सेवा बजावत होता. लग्नानंतर मीनाक्षी ही सासू, सासरा व पतीसह मालदिनी या गावी राहत होती. लग्नानंतर एक महिना तिला चांगली वागणूक दिली गेली. त्यानंतर सासरच्यांकडून हुंड्यासाठी छळ करण्यात आला होता. लग्नामध्ये काहीही आणलेली नाहीस पाच तोळे सोने व पाच लाख रुपये रोख रक्कम आणण्यासाठी तिच्याकडे तगादा लावण्यात आला होता. सदर विषय फिर्यादी मीनाक्षी हिने आपल्या माहेरी आईला कळविला होता.
तिच्या आईने आरोपींच्या घरी भेट देऊन समजूत घातली होती. मुलीला त्रास देऊ नका अशी विनंती केली होती. तरीही आरोपींकडून फिर्यादीला त्रास देण्याचे थांबविण्यात आले नाही. दि. 19 जानेवारी 2021 रोजी रात्री 8.30 वाजता सासू, सासरे यांच्याकडून तिला मारहाण करण्यात आली. याला पतीनेही साथ देऊन तिच्या तोंडात विषाची बॉटल ओतली होती. यामुळे तिने घरातून बाहेर येऊन आरडाओरड केली होती. गल्लीतील नागरिकही यावेळी जमले होते. फिर्यादीच्या आईने मीनाक्षीला घेऊन गोकाक सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. यावरून फिर्यादी मीनाक्षी हिने सासू, सासरा व पतीविरोधात गोकाक पोलिसांत तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी बेळगाव येथील सहावे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात सरकारतर्फे दावा चालविला होता. एकूण 13 साक्षीदारांचे साक्ष 16 कागदपत्र पुरावे व मुद्देमाल सादर केले होते. न्यायालयाने साक्षीदारांतील विसंगतीमुळे संशयितांची निर्दोष मुक्तता केली. सदर प्रकरणी आरोपीच्यावतीने अॅड. शामसुंदर पत्तार, अॅड. शंकर बाळनाईक, अॅड. हेमराज बेंचन्नावर, अॅड. विशाल चौगुले, अॅड. विकेश तेरदाळकर अॅड. महेश मजुकर यांनी काम पाहिले.









