कोल्हापूर :
आंतरजातीय प्रेमविवाह केल्याच्या रागातून नवविवाहित तरुणाचे त्याच्या सासऱ्याने ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण केले.त्याला जबर मारहाण करुन मिरज येथे कोंडून ठेवले होते.याची माहिती पोलिसांना समजताच त्यांनी त्याची सुखरूप सुटका करत रुग्णालयात दाखल केले. विशाल मोहन आडसुळ (वय 26, भुये, ता. करवीर, जि. कोल्हापूर) या नवविवाहित तरुणाचे नाव आहे.
याप्रकरणी मुख्य संशयीत आरोपी श्रीकृष्ण महादेव कोकरे (वय 45, रा. वाघमोडेनगर, कुपवाड, ता. मिरज, जि. सांगली) त्याचे साथिदार धीरज उर्फ हणमंत नामदेव पाटील (वय 56, रा. कवठेपिरान, ता. मिरज, जि. सांगली), राजेंद्र परमेश्वर कट्टीमनी (वय 33, रा. कुपवाड एमआयडीसी, ज्ञानगिरी वसाहत, सावळी, ता. मिरज, जि. सांगली) या तिघांना अटक केली. त्याच्याकडून गुह्यात वापरलेली एक चारचाकी व एक दुचाकी जप्त केली आहे. तर अन्य चार संशयिताचा पोलिसांच्या वेगवेगळ्या पथकाकडून शोध घेतला जात आहे. याबाबत करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीस निरीक्षक कळमकर म्हणाले, मुख्य संशयीत श्रीकृष्ण कोकरे याची मुलगी श्रुती हिची अपह्त विशाल आडसुळ याच्याशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून या दोघांनी 7 महिन्यापूर्वी आंतरजातीय प्रेमविवाह केला. हा प्रेमविवाह श्रुतीचे वडील कोकरेना मान्य नव्हता. त्यामुळे त्यांनी आपल्या नवविवाहित जावाई विशाल याला ठार मारण्याच्या उद्देशाने अपहरण करण्याचा प्लॅन केला. त्यानुसार त्याचे 9 फेब्रुवारी 2025 रोजी रात्री सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास भुयेवाडी गावाच्या कमानीजवळून (ता. करवीर) येथून चारचाकीमधून अपहरण केले. या अपहरणेच्या घटनेचा करवीर पोलिसात गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गुन्हा घडलेल्या घटनास्थळी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी भेटी दिल्या.
गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून अपह्त विशाल सुखरुप सुटका व्हावी. याकरीता स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि करवीर पोलीस ठाण्याच्या पोलिसांची वेगवेगळी तपास पथके तयार करून शोध सुरु केला. याचदरम्यान अपह्त विशाल याचे अपहरण त्याचा सासरा श्रीकृष्ण कोकरे याने साथीदाराच्या मदतीने केले आहे. अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या तपास पथकातील पोलीस हवालदार रामचंद्र कोळी यांना बातमीदाराकडून मिळाली. त्यावरुन अपहरणकर्ता कोकरेचा पोलिसांनी शोध सुरु केला. याचवेळी तो सांगली येथे येणार आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली. त्यावरुन स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि त्यांच्या तपासी पथकांनी सांगली शहरालगतच्या अंकली पुलानजीक सापळा रचून ताब्यात घेतले. त्याच्याकडे अपह्त विशालबाबत चौकशी सुरु केली. प्रथम त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.
पण पोलिसांनी त्याला विश्वासात घेवून कौशल्यपुर्ण तपास केला. त्यावेळी त्याने अपह्त विशाल याचे आंतरजातीय प्रेमविवाह मान्य नसल्याने ठार मारण्याच्या उद्देशाने सहा साथीदारांच्या मदतीने अपहरण केले असून, त्याला जबर मारहाण करुन, मिरज (जि. सांगली) न्यायालयाच्या पाठीमागे असलेल्या वेधस अपार्टमेंट मधील बंद प्लॅटमध्ये दोरीने बांधून, कोंडून ठेवल्याचे सांगितले.
त्यावरुन पोलिसांनी वेधस अपार्टमेंटकडे धाव घेतली. या अपार्टमेंटमधील बंद प्लॅटचा दरवाजा व कुलूप तोडुन मंगळवारी दुपारी सुटका केली. जखमी विशालला उपचारासाठी कोल्हापूरातील व्हिसन कॉर्नर येथील एका खासगी रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर पोलिसांनी या अपहरण प्रकरणातील मुख्य संशयीत कोकरेसह त्याचे तीन साथिदार धीरज उर्फ हणमंत पाटील, राजेंद्र कट्टीमनी याना अटक करीत, त्याच्याकडून गुह्यात वापरलेल्या चारचाकी गाडी आणि एक दुचाकी जप्त केली. या चौघा संशयितांना पुढील तपासाठी करवीर पोलिसांच्या ताब्यात दिले. तर अन्य चार पसार संशयिताची नावे पोलिसांना समजली असून, त्याचा शोध सुरु केला आहे.
- 44 तासानंतर अपह्ताची सुटका
विशाल आडसुळ याचे 9 फेब्रुवारी रोजी रात्री 9.15 च्या सुमारास अपहरण करण्यात आले. अपहरणाच्या घटनेचा पोलिसांनी गांभीर्याने दखल घेवून, अपह्त विशालची अपहरणनाट्यानंतर अविरतपणे शोध घेवून, मंगळवार (11 फेब्रुवारी) दुपारी सुमारे 44 तासानंतर पोलिसांनी सुटका केली. त्यामुळे तपासी पोलिसांचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.








