पोलीस आयुक्तांना निवेदन, कामगार संघटनेतून संताप
प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हा बांधकाम संघटना बांधकाम कामगारांना तसेच इतर कामगारांना न्याय देण्याचा प्रयत्न करत आहे. ज्यांना कार्डची गरज आहे त्यांना कार्ड काढून देण्यासाठी मोफत मदत करत आहे. मात्र बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष ऍड. एन. आर. लातूर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास खपवून घेणार नाही, अशा आशयाचे निवेदन ऍड. एन. आर. लातूर व अन्य वकिलांनी पोलीस आयुक्तांना दिले आहे.
ऍड. एन. आर. लातूर यांनी कामगारांच्या कल्याणासाठी दिवसरात्र प्रयत्न केले आहेत. कामगारांसाठी असलेल्या योजना त्यांनी सर्व कामगारांसमोर आणि जनतेसमोर आणल्या. त्यानंतर बांधकाम, सेंट्रींग व इतर कामगारांना त्याचा लाभ मिळत गेला. त्यामुळे त्यांच्या पाठीशी जिल्हय़ातील संपूर्ण कामगारवर्ग ठामपणे उभा आहे. मात्र राजकीय वजन वापरून एक व्यक्ती त्यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करण्यासाठी अधिकाऱयांवर दबाव घालत असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे.
याबाबत येथील कामगार कार्यालयातील अधिकाऱयांनी सर्व कार्डांची तसेच इतर चौकशी केली. मात्र त्यामध्ये काहीच गैर आढळले नसल्याने गुन्हा दाखल झाला नाही. त्यामुळे बेंगळूर येथील एका विशेष अधिकाऱयाची नेमणूक करून मला नोटीस दिली गेली आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मी जर गुन्हेगार असेन तर माझ्यावर गुन्हा दाखल करा. मात्र खोटा गुन्हा दाखल करत असाल तर आम्ही गप्प बसणार नाही, असा इशारा ऍड. एन. आर. लातूर यांनी या निवेदनाद्वारे दिला आहे.
या घटनेमुळे बेळगाव तालुक्मयाबरोबरच शहर, जिल्हय़ातील कामगारांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. जर ऍड. एन. आर. लातूर यांच्यावर निष्कारण गुन्हा दाखल करण्यात आला तर एकजुटीने त्याला विरोध करून संबंधित राजकीय व्यक्तीला त्याची जागा दाखवून देण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. याचबरोबर बार असोसिएशन आणि राज्य बार असोसिएशनदेखील आपल्या पाठीशी असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ऍड. एन. आर. लातूर, ऍड. अनिल शिंदे, ऍड. यशवंत लमाणी, ऍड. दऱयाप्पा बिळगी, कामगार संघटनेचे कार्यवाह सुरेश हणबर, समीउल्ला मकानदार यांच्यासह इतर कामगार उपस्थित होते.









