रायबाग रेल्वेस्थानकाजवळील प्रकार : पत्नीसह चौघांना अटक
बेळगाव : बेळगाव रेल्वे पोलिसांनी एका खळबळजनक खुनाचा छडा लावला आहे. खून करून मृतदेह रेल्वेरूळावर टाकून आत्महत्या भासवण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिलेसह चौघाजणांच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रायबाग रेल्वेस्थानकाजवळ हा प्रकार घडला होता. रेल्वे विभागाच्या पोलीसप्रमुख सौम्यलता, पोलीस उपअधीक्षक लोकेश्वराप्पा, पोलीस निरीक्षक शिवाप्पा मरडी आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव रेल्वे पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक सत्याप्पा मुक्कण्णावर यांनी ही कारवाई केली आहे. रेल्वे पोलिसांनी या प्रकरणाचा खोलवर तपास केले नसते तर खून करून आत्महत्या भासविणाऱ्यावर कारवाई झाली नसती.
उपलब्ध माहितीनुसार मंगळवार दि. 3 डिसेंबर रोजी सकाळी रायबाग रेल्वेस्थानकाजवळ एक मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी त्याची ओळख पटवली. बिरप्पा करवळ्ळी (वय 31) रा. बिरनाळ, ता. रायबाग या युवकाचा तो मृतदेह असल्याचे उघडकीस आले होते. सुरुवातीला बिरप्पाने रेल्वेखाली आत्महत्या केल्याचे एफआयआर दाखल करण्यात आले होते. सुरेखा व निलप्पा यांच्यात अनैतिक संबंध होते. या दोघाजणांनी बिराप्पाचा काटा काढण्याचे ठरवले. यासाठी एक योजनाही तयार करण्यात आली. सोमवार दि. 2 डिसेंबर रोजी निलप्पाने बिराप्पाला रायबागला बोलावले.
कंट्याप्पा, महांतेशही तेथे होते. एका बारमध्ये यथेच्छ दारू ढोसल्यानंतर बिराप्पाला बिरनाळला सोडण्याचे सांगून त्याला मोटरसायकलवर बसवून घेण्यात आले.बिरनाळजवळ येताच गावाजवळील डोंगरात नेऊन बिराप्पाच्या डोक्यावर दगड घालण्यात आले. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. मात्र, पूर्णपणे त्याचा जीव गेला नव्हता. मोटरसायकलवरून अर्धमेल्या अवस्थेतील बिराप्पाला घटनास्थळापासून सुमारे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रेल्वेरूळावर नेऊन त्याला फेकून देण्यात आले. रात्री रेल्वे अंगावरून गेल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा
संशयावरून पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले असता बिराप्पाची पत्नी व तिच्या प्रियकराने अन्य दोघांच्या मदतीने त्याचा खून केल्याचे उघडकीस आले. त्यामुळे खून झालेल्या बिराप्पाची पत्नी सुरेखा करवळ्ळी (वय 25), तिचा प्रियकर निलाप्पा करवळ्ळी (वय 21), दोघेही रा. बिरनाळ, कंट्याप्पा माळगी (वय 23) रा. शिरहट्टी, महांतेश पुजारी (वय 24) रा. मेकळी यांना अटक करण्यात आली आहे.









