उंब्रज :
जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हवेत चार राउंड फायरिंग करून दहशत माजविण्याची घटना भवानवाडी (ता. कराड) येथे १८ रोजी रात्रीच्या सुमारास घडली. त्यानंतर दोन तासांत संशयित आरोपींच्या मुसक्या उंब्रज पोलिसांनी आवळल्या. चौघांना पोलिसांनी जेरबंद करून एक लाख ७१ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. याबाबतची माहिती शुक्रवारी २१ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १८ मार्च रोजी रात्री साडेआठच्या सुमारास भवानवाडी गावच्या हद्दीत फिर्यादीच्या ऊसतोड कामगारांची व मकरंद गुलाब सूर्यवंशी याचा ट्रॅक्टर चालक पाखऱ्या यांची भांडणे झाली होती. या रागातून संशयित आरोपी सोन्या उर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी, मकरंद गुलाब सूर्यवंशी (दोघे रा. सूर्यवंशी मळा, चरेगाव, ता. कराड), पुंजाराम सुखदेव पाखरे (सध्या रा. सूर्यवंशी मळा, चरेगाव, ता. कराड, मूळ रा. पोकळवड, ता. जि. जालना), राज अकुंश आवळे (रा. खालकरवाडी, ता. कराड) हे स्कुटी व बुलेट दुचाकीवरून आले. सोन्या उर्फ ऋषिकेश गुलाब सूर्यवंशी याने सिंगल बोर बंदुकीने जीवे मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या अंगावर गोळीबार केला.
फिर्यादीने बंदुकीचा बॅरल वर ढकलल्याने तो राऊंड फिर्यादीच्या कानाजवळून गेला. तसेच मकरंद सूर्यवंशी व पुंजाराम पाखरे यांनी फिर्यादीचे ऊसतोड कामगार मुकेश पतीराम पाटील यास मारहाण केली.
ऋषिकेश सूर्यवंशी याने हवेत बंदुकीतून चार राऊंड फायर करून दहशत निर्माण केली. संशयित आरोपींनी फिर्यादीस शिवीगाळ करून ‘तुला आज रात्री जिवंत ठेवत नाही अशी धमकी देऊन निघून गेले. याबाबत उंब्रज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रार दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षक समीर शेख, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र भोरे यांना या गुन्ह्यातील संशयित आरोपींचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या. रवींद्र भोरे तसेच पोलीस अंमलदार यांच्यासह भवानवाडी, खालकरवाडी, चरेगाव या भागामध्ये पेट्रोलिंग करून संशयितांचा शोध घेतला. त्यांना ताब्यात घेऊन अटक केली. त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली. संशयितांनी गुन्ह्यात वापरलेली बंदुक, रिकाम्या पुंगळ्या व दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. तपास रवींद्र भोरे करीत आहेत.
दरम्यान, अवैध शस्त्र कोणत्याही परिस्थितीमध्ये नागरिकांनी बाळगू नये व त्याची माहिती तत्काळ पोलीस ठाण्याला द्यावी, असे आवाहन पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी केले आहे.
- पोलिसांकडून गुन्ह्याची माहिती देण्यास का होतोय उशीर ?
सातारा जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये किरकोळ व गंभीर स्वरूपाचे गुन्हे सातत्याने घडतात. पूर्वी गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याची माहिती प्रसिद्धी माध्यमातून छापून आल्यानंतर लोक जागृती होऊन गुन्हेगारांना तोंड लपवावे लागत होते. तसेच गुन्ह्याची अधिकची माहिती, संशयित आरोपींना पकडणे सोयीस्कर जात होते. सद्यस्थितीत मात्र दाखल गुन्ह्याची माहिती वेळेवर प्रसार माध्यमांना दिली जात नसल्याने आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना जनतेला वेळेवर समजून येत नाहीत. याउलट घडलेल्या गुन्ह्यांची दोन दिवसांनंतर सोयीस्कर प्रेसनोट दिली जाते. उंब्रज पोलीस ठाण्याच्या हद्दीत भवानवाडी येथे १८ रोजी रात्री ८.३० वाजण्याच्या सुमारास चार राऊंड फायरिंग झाले. संशयित आरोपींना अवघ्या दोन तासांत जेरबंद केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. मात्र याची प्रेसनोट तब्बल तीन दिवसांनी २१ रोजी दुपारी देण्यात आली.








