एकंबे :
कोरेगाव शहरात मेन रोडवर भारतीय स्टेट बँक आणि आयडीबीआय बँकेपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या भुतडा कॉम्प्लेक्समध्ये सुशील ज्वेलर्स हे सराफी दुकान फोडण्याचा प्रयत्न रविवारी पहाटे तीन परप्रांतीय चोरट्यांनी केला. मात्र एका जागरूक व्यापाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा प्रयत्न पूर्णपणे फसला. पोलिसांनी गतिमान हालचाल करत तिघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यापैकी दोघांना अटक केली आहे. एक विधी संघर्ष बालकाचा समावेश आहे.
याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यातून सायंकाळी पाच वाजता मिळालेल्या माहितीनुसार मेनरोडवरील भुतडा कॉम्प्लेक्स ही पूर्णपणे वाणिज्य वापरातील इमारत आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांचे जनसंपर्क कार्यालय, दुसऱ्या मजल्यावर सराफी आणि भांडी दुकान तर तळमजल्यावर सुशील राजेंद्र घाडगे (रा. ल्हासुर्णे) यांचे सुशील ज्वेलर्स नावाचे सराफी दुकान आहे. तिच्या शेजारी अन्य तीन ते चार दुकाने आहेत. रविवारी पहाटे सव्वा दोनच्या सुमारास तिघा चोरट्यांनी सुशील ज्वेलर्स या दुकानाच्या फोल्डिंग शटरच्या खालील बाजूस असलेली फरशी फोडण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर फोल्डिंग शटरच्या मधोमध असलेले कुलूप देखील तोडण्याचा प्रयत्न केला.
मध्यरात्री जोरजोरात ठोकण्याचा आवाज येत असल्याने वरच्या मजल्यावर असलेल्या अरिहंत स्टील सेंटरचे मालक किशोर कांतीलाल ओसवाल यांची झोपमोड झाली. यापूर्वी भुतडा कॉम्प्लेक्समध्ये चोरीचे प्रयत्न झाल्याने ओसवाल हे दररोज रात्री आपल्या दुकानातच झोपत आहेत. कॉम्प्लेक्समध्ये चोरटे आले असल्याचे त्यांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने पोलीस ठाण्यात मोबाईलवरून कॉल करून चोरटे आल्याची माहिती दिली. पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले हे कर्मचाऱ्यांचा ऑल आऊट नाकाबंदीमध्ये होते. त्यांनी माहिती मिळताच पोलीस कर्मचाऱ्यांसह भुतडा कॉम्प्लेक्स गाठले. पोलिसांना पाहताच घाबरलेल्या दोघा चोरट्यांनी अंधाराचा फायदा घेत पळ काढला. तिसरा मात्र अलगद पोलिसांच्या तावडीत सापडला. दोघे चोरटे हे आयडीबीआय बँकेच्या समोर असलेल्या एका बोळातून नवीन एसटी स्टँडच्या बाजूला असलेल्या शेतीकडे पळाले. एकाला ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी अन्य दोघांचा शोध सुरू केला. शेतातून त्यांना ताब्यात घेतले. त्यासाठी पोलिसांना मात्र चांगलाच पाठलाग करावा लागला. मंगलकुमार सियारामकुमार आणि रणजित कुमार अशी दोघा चोरट्यांची नावे असून आणि एक विधीसंघर्ष बालक आहे. तिघेही मूळचे उत्तर प्रदेश राज्यातील अयोध्या जिह्यातील रहिवासी असल्याचे पुढे आले आहे. त्यांनी पलीया या गावचे आपण रहिवासी आहोत, असे पोलिसांना चौकशी दरम्यान सांगितले. मिळेल ते काम करून ते उदरनिर्वाह करत होते. सध्या ते कोरेगावातच एका खाजगी ठिकाणी नोकरी करत होते. नोकरीनिमित्त ते ओळखीच्या माणसाद्वारे महाराष्ट्रात थेट कोरेगावात आल्याचे चौकशीत पुढे आले आहे.
व्यापारी किशोर ओसवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोरेगाव पोलीस ठाण्यात चोरीचा प्रयत्न केल्याबद्दल तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना वैद्यकीय तपासणीनंतर अटक करण्यात आली आहे. विधी संघर्ष बालकाला मात्र सातारा येथील बाल न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
दुपारी दोघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार नागराज कदम तपास करत आहेत.








