पोलिसांवर गोळीबार करून चोरटे पसार : चोरट्यांची काही अवजारे, दुचाकी जप्त

वास्को : झुआरीनगरातील एक बंगला फोडण्याचा प्रयत्न सोमवारी पहाटे झाला. पोलीस दाखल झाल्याचे दिसताच अज्ञात चोरट्यांनी गोळीबार करून घटनास्थळावरून पोबारा केला. या गोळीबारातून पोलीस उपनिरीक्षक व होमगार्ड बचावले. चोरट्यांनी पलायन करण्यासाठी तसेच पोलिसांना रोखण्यासाठी त्यांनी गोळीबाराचा थरार निर्माण केला आणि पसार होण्यास यशस्वीही ठरले. या प्रकरणात तिघा चोरट्यांचा समावेश असून पोलिसांनी त्यांची दुचाकी जप्त केली आहे. वास्को पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सोमवारी मध्यरात्रीनंतर सव्वा दोन ते तीनच्या सुमारास बंगला फोडण्याचा प्रयत्न आणि गोळीबार करून पसार होण्याचा थरारक प्रकार घडला. गोळीबार करणाऱ्या आणि पसार होणाऱ्या चोरट्यांना पोलिसांनी पाहिले व त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, चोरट्यांनी पोलिसांच्या दिशेने हवेत गोळीबार करून पोलिसांना रोखले. बंदूकीचा धाक दाखवल्यामुळे चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला. पोलिसांनी नाकाबंदी केल्याने घटनास्थळापासून साधारण दोन किलोमिटरवर चोरट्यांनी दुचाकी टाकून देऊन पोबारा केला. ही दुचाकी पल्सर असून पोलिसांनी ती जप्त केली आहे. ही दुचाकी चोरीची असल्याची माहिती मिळाली आहे.
बंदच असतो बंगला
अधिक माहितीनुसार झुआरीनगर सांकवाळ येथील एमईएस महाविद्यालयाजवळ जाणाऱ्या रस्त्यावरील एक बंगला फोडण्याचा प्रयत्न चोरट्यांनी केला. हा बंगला एका गोमंतकीय डॉक्टराचा आहे. हे कुटुंब विदेशात असल्याने तो बंदच असतो. मात्र, बंगल्यात किमती ऐवज असावा अशा संशयाने चोरट्यांनी हा बंगला फोडण्याचा प्रयत्न केला. पहाटेच्या वेळी कसला तरी आवाज येऊ लागल्याने बंगला फोडण्याचा प्रयत्न होत असल्याचे या वसाहतीतील काहींच्या लक्षात आले. त्यामुळे दोनच्या सुमारास चोरांच्या हालचालींबाबत वास्को पोलिसांना माहिती मिळाली. पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक इतर पोलिसांसमवेत घटनास्थळी दाखल झाले. एक चोरटा बाहेर पहारा देत थांबला होता तर आत दोघे जण चोरी करण्यासाठी गेले होते. बाहेरील चोरट्याने पोलीस आल्याचा इशारा देताच एक चोरटा कुंपणावरून उडी मारून पसार झाला. काळोखामुळे त्याचा पाठलाग पोलिसांना करता आला नाही.
चोरट्यांनी हवेत झाडली गोळी
राहिलेल्या दोघा चोरट्यांपैकी एकाने पोलिसांना रोखण्यासाठी त्यांच्या बाजूने एक गोळी हवेत झाडली. ही गोळी उपनिरीक्षकाच्या डोक्यावरून गेली. दुसऱ्यांदा झाडलेली गोळी जमिनीवर आपटून क्षिद्रे प्रल्हाद नाईक या होमगार्डच्या पायाला लागली. त्यामुळे त्याला किरकोळ दुखापत झाली. गोळीबाराचा धाक दाखवल्याने पोलिसांना काही करता आले नाही. या चोरट्यांची दुचाकी बाहेरच होती. थरार निर्माण करून दोघेजण त्या दुचाकीवर बसून पसार झाले.
नाकाबंदीमुळे दुचाकी टाकून पळाले
पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील नाईक यांनी ही माहिती वेर्णा पोलीस स्थानकाला दिली व सर्वत्र सतर्क राहण्याचा संदेश पोहोचवला. त्यामुळे या चोरट्यांना पकडण्यासाठी ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली. दुचाकीवरून पळालेल्या चोरट्यांना नाकाबंदीची कल्पना आल्याने त्यांनी दुचाकी वाटेतच टाकून दिली व ते गायब झाले. बंगल्याचा दरवाजा फोडण्यासाठी चोरट्यांनी आणलेली अवजारे पोलिसांनी जप्त केली आहेत. चोरटे जवळपासचे असण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, रात्री उशिरापर्यंत कुणी हाती लागला नव्हता. सदर बंगला तीन वर्षांपूर्वीही चोरट्यांनी फोडला होता. मात्र चोरांच्या हाती काही लागले नव्हते. या बंगल्याच्या बाबतीत ही दुसरी घटना घडलेली आहे.









