पुणे / वार्ताहर :
पुणे-सोलापूर दरम्यान एचपीसीएल कंपनीची पेट्रोल, डिझेल आणि केरोसीन वाहतुकीची पाईपलाईन टाकण्यात आलेली आहे. अज्ञाताने मोहतोबा आळंदी परिसरात ही पाईपलाईन फोडून इंधन चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञातावर लोणीकाळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत लोणीकाळभोर येथील एचपीसीएल कंपनीचे असिस्टंट मॅनेजर गौरव केमचंद गुप्ता (वय 32) यांनी याबाबत पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. सदरचा प्रकार 24 जुलै रोजी घडला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एचपीसीएल कंपनीची इंधन वाहतुकीची मुंबई-पुणे-सोलापूर मार्गावर लोखंडी पाईपलाईन आहे. चॅनेल क्रमांक 172.3 जवळ अज्ञाताने पेट्रोल, डिझेल, केरोसीन चोरीच्या उद्देशाने पाईपलाईन फोडून त्याला एक इंच व्यासाचा व 112 सेमी. लांबीचा प्लास्टिकचा पाईप जोडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीवर भारतीय दंड विधान कलम 379 ,511, 286, 427, पेट्रोलियम आणि खनिज वाहक नळे आधनियम 1962 चे कलम 15 ,16 ,सार्वजनिक संपत्ती नुकसान प्रतिबंधक अधिनियम 1984 चे कलम 3, अत्यावश्यक वस्तू अधिनियम कलम 1955 अधिनियम 3,7(1) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्ता चव्हाण म्हणाले, संबंधित इंधन पाईपलाईन यास ठिकठिकाणी सेंसर लावण्यात आलेले आहेत. त्यामुळे कुठेही गैरप्रकार घडत असल्यास त्याची माहिती तात्काळ एचपीसीएल कंपनीला मिळते. त्यानुसार मोहतोबा आळंदी याठिकाणी टेकडीच्या परिसरात कुणीतरी अज्ञाताने पाईपलाईन मधून इंधन चोरीचा प्रयत्न केला असल्याचे दिसून आले आहे. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीचा शोध पोलीस घेत आहेत.









