प्रतिनिधी /वास्को
वास्कोतील दाबोळी भागात एक बंगला फोडून 12 लाखांचा ऐवज गुंडाळून गोव्यातून पसार झालेल्या चौघा अट्टल चोरट्यांना उत्तर प्रदेशात गजाआड करण्यात आले. तेथील पोलिसांनी या चोरट्यांना गोवा पोलिसांच्या ताब्यात दिल्यानंतर बुधवारी त्यांना वास्कोत आणण्यात आले. सोने, चांदी व रोख मिळून 12 लाखांचा चोरीचा ऐवज त्यांच्याकडून हस्तगत करण्यात आला आहे. त्यांना अटक करण्यात आलेली असून त्यांची नावे जितेंद्र भेडिया(30), विजय मोहनलाल(23), उमेश मोहनलाल(20) व रोहित देव सिंग(19) अशी आहेत. हे सर्वजण उत्तर प्रदेशातील अट्टल चोरटे आहेत.
वास्को पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चोरीची ही घटना 11 ते 15 जानेवारीच्या दरम्यान घडली होती. आल्त दाबोळी वास्कोतील सनराईज व्हिला हा बंगला आात चोरट्यांनी फोडल्याचे व आतील सोने, चांदी व रोख मिळून 12 लाखांचा ऐवज चोरल्याचे निदर्शनास आले होते. बंगल्यात कोणीच नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा तोडून ही चोरी केली होती. हा प्रकार उघडकीस येताच, या बंगल्याच्या मालकाचे एक कर्मचारी शशिकांत करीयप्पा हनहारावत्ती याने पोलीस तक्रार केली होती. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर बंगल्याचे मालक राजीव गुप्ता यांनीही चोरीस गेलेल्या ऐवजाविषयी सविस्तर माहिती वास्को पोलिसांना दिली. त्यामुळे पोलिसांनी गोव्यासह इतर राज्यातील पोलिस स्थानकानाही या चोरी विषयी व मुद्देमालाविषयी माहिती पुरवली होती. त्यानंतर गोव्यातील एका बंगल्यात चोरी करून काही चोरटे चोरीच्या ऐवजासह उत्तर प्रदेशातील एका शहरात येत असल्याची माहिती तेथील पोलिसांनी मिळाली होती. त्यामुळे बहाजोय पोलिसांनी पाळत ठेवली होती. त्यामुळे तेथील रेल्वे स्थानकात चार चोरट्याना गजाआड करण्यास त्या पोलिसांना यश आले. या चोरट्यांनी गोव्यात एका बंगल्यात आपण चोरी केल्याची कबुली दिली.
त्यामुळे उत्तर प्रदेशातील संभाल जिल्ह्यातील बहाजोय पोलीस स्थानकाच्या पोलिसांनी ही माहिती वास्को पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक रोहन नागेशकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संतोष भाटकर, हवालदार दामोदर मयेकर, शिपाई रोहन बिट्यो या पोलिसांचे एक पथक उत्तर प्रदेशला रवाना झाले होते. तेथील कायदेशीर सोपस्कर पूर्ण करून त्या चारही चोरट्याना चोरीच्या ऐवजासह बुधवारी दुपारी वास्कोत आणण्यात आले. हे चोरटे अट्टल चोरटे असून उत्तर प्रदेशातील विविध चोऱ्यांमध्येही त्यांचा सहभाग आहे. चोरीच्या उद्देशानेच ते गोव्यात आले आहे. चोरी करण्यास ते यशस्वी ठरले. मात्र, तेथील पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्याने त्यांचा हा बेत अयशस्वी ठरला. पोलीस उपअधीक्षक सलीम शेख व पोलीस निरीक्षक कपिल नायक यांच्या मार्गदर्शनाखाली वास्को पोलीस या चोरी प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.









