यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात 3 घरफोड्यांची कबुली : कारसह मुद्देमाल जप्त
प्रतिनिधी / बेळगाव
यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रातील होसूर, उळागड्डी खानापूर येथे बंद घरांचा कडीकोयंडा तोडून सोन्या-चांदीचा ऐवज लांबविणाऱ्या अट्टल चोरट्याला अटक करण्यात आली आहे. तो कोल्हापूर येथील राहणारा असून त्याच्याजवळून 122 ग्रॅम सोने व 640 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.
विशाल नरसिंग शेरखाने (वय 53) रा. कोल्हापूर असे त्याचे नाव असून सोमवारी त्याला अटक करून कसून चौकशी केली असता त्याने एका यमकनमर्डी पोलीस स्थानकाच्या कार्यक्षेत्रात तीन घरफोड्यांची कबुली दिली आहे. यापूर्वीही यमकनमर्डी पोलिसांनी त्याला अटक केली होती.
पोलीस निरीक्षक रमेश छायागोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक शिवू मण्णीकेरी, वाय. डी. गुंजगी, एस. बी. पुजेरी, एस. ए. शेख, शंकर चौगुला, एल. बी. हमानी, सतीश रेड्डी , पी. डी. गवानी, एस. ए. घोरी, पी. बी. गाडीव•र आदींचा समावेश असलेल्या विशेष पथकाने या अट्टल चोरट्याला अटक केली आहे.
29 मे 2023 रोजी दुपारी 12 ते 4 यावेळेत होसूर येथील पारीस भरमाप्पा अक्कतंगेरहाळ यांच्या बंद घराचा कडीकोयंडा तोडून सुमारे 1 लाख 16 हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने व 32 हजार रुपये रोख रक्कम चोरण्यात आली होती. याप्रकरणाचा तपास करताना विशाल शेरखाने याला अटक करण्यात आली आहे.
यमकनमर्डी परिसरात संशयास्पदरीत्या फिरताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता त्याने घरफोड्यांची कबुली दिली आहे. होसूर येथील चोरीबरोबरच उळागड्डी खानापूर येथेही दोन घरफोड्या केल्याचे त्याने कबूल केले असून चोरीसाठी वापरण्यात आलेली एमएच 09, एबी 5845 क्रमांकाची कार, अवजारे, 122.5 ग्रॅम सोने, 640 ग्रॅम चांदीचे दागिने जप्त करण्यात आले
आहेत.









