साडेतीन लाखाच्या आठ मोटारसायकली जप्त
बेळगाव : एका अट्टल मोटारसायकल चोराला अटक करून त्याच्याजवळून 3.50 लाख रुपये किमतीच्या आठ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत. बेळगाव ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केली आहे. परशराम सन्नभीमाप्पा कुर्ली (वय 28) रा. कमलनगर, बेळगाव असे त्याचे नाव आहे. 6 एप्रिल रोजी देसूरजवळील कमलनगर येथील एका पोल्ट्री फार्मजवळ उभ्या केलेल्या मोटारसायकलची चोरी झाली होती. या प्रकरणी भादंवि 379 कलमान्वये बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आला होता. ग्रामीणचे एसीपी गोपाळकृष्ण गौडर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण मुरगुंडी, उपनिरीक्षक आदित्य राजन, साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक व्ही. डी. सरनाईक, एस. बी. उप्पार, बी. एस. पडनाड, एम. एम. नाईक, एस. एस. हंचिनमनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी परशुरामला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याजवळून हिरो एचएफ डिलक्स 1, पाच हिरोहोंडा स्प्लेंडर, 1 पल्सर व 1 पॅशन प्लस अशा एकूण आठ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची किंमत 3 लाख 50 हजार रुपये इतकी होते. यापूर्वीही बेळगाव ग्रामीण पोलिसांनी त्याला चोरी प्रकरणी अटक केली होती.









