अध्याय अकरावा सारांश
ह्या अध्यायाचे नाव त्रिविधवस्तुविवेकनिरुपण असे आहे. हा गणेशगीतेचा शेवटचा अध्याय आहे. त्रिगुणांच्या आश्रयाने मोहवणाऱ्या मायेचे नियमन करण्यासाठी श्रीगजाननप्रभू ह्या अध्यायात त्रिगुणांमधले फरक समजावून सांगत आहेत. प्रथम कायिक, वाचिक आणि मानसिक तपाची लक्षणे त्यांनी सांगितली असून त्यातील सात्विक, राजस आणि तामस तपातील फरक समजावून सांगितला आहे. मुळीच कंटाळा न करता बाप्पांच्यावरील प्रेमापोटी केले जाते ते सात्विक तप होय. ह्या तपामुळे माणसाचा उद्धार होतो. ऐश्वर्य आणि देहसुख मिळवण्यासाठी राजस तप केले जाते. हे माणसाला जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकवते. तामस तप दुसऱ्याला त्रास देण्यासाठी केले जात असल्याने ते माणसाला नरकात लोटते.
विधीवाक्य प्रमाण मानून केलेले दान सात्विक असते तर मोबदल्याची अपेक्षा ठेवून दिलेले दान राजस होय. हे दिल्याने पश्चाताप होतो. शास्त्राची अवज्ञा करून जे दान दिले जाते त्याला तामस दान असे म्हणतात. सर्व भूतमात्रात बाप्पाच भरून राहिले आहेत ह्याची जाणीव करून देणारे ज्ञान सात्विक असते तर माणसामाणसात भेदाभेद असतो ह्याची जाणीव करून देणारे ज्ञान राजस असते. देहालाच आत्मा समजणारे क्षुद्र ज्ञान तामस होय.
निरपेक्षतेने केलेल्या कर्माला सात्विक कर्म असे म्हणतात. दगदग करून फळाच्या अपेक्षेने केलेले कर्म राजस असते तर आपली हानी करून घेऊन केलेले कर्म तामसी असते. मोठ्या उत्साहाने धैर्य धरून कर्म करणारा कर्ता सात्विक तर कर्म करताना हर्ष, शोक पावणारा, फळाची अपेक्षा ठेवणारा कर्ता राजस ठरतो. कामाबाबत पुरेशी माहिती न घेता, होणाऱ्या चुकांची तमा न बाळगता, दुसऱ्याला दु:ख देणारे कर्म करणारा कर्ता तामसी असतो.
सुखदु:खाचेही तीन प्रकार आहेत. सुरवातीला कष्टदायक पण अंती हितकारक ठरणारे सुख सात्विक असते तर सुरवातीला सुखाचे वाटणारे पण अंती अकल्याण करणारे सुख राजसी असते. चुका आणि आळस ह्यामुळे जे सुखाचे आहे असे वाटते व ते पुन:पुन्हा मिळवावे असे वाटते ते सुख तामसी असते. ब्रह्म देखील ओम, तत, सत असे त्रिगुणयुक्त आहे.
पुढे बाप्पा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शुद्र ह्या चारही वर्णांची कामे सांगतात. ह्याप्रमाणे वाट्याला आलेलं कर्म करून जे बाप्पांना अर्पण करतात त्यांना बाप्पांच्या कृपेने मोक्ष मिळतो. बाप्पांची राजावर कृपा असल्याने त्यांनी राजाला अनादिसिद्धयोग सांगोपांग आणि सविस्तर सांगितला. पुढे बाप्पा म्हणाले, मी सांगितलेल्या योगावर चित्त एकाग्र कर. मी ह्यापूर्वी हा योग कुणालाही सांगितलेला नाही. तुही हा योग गुप्त ठेव म्हणजे तुला परमसिद्धी मिळेल. त्याप्रमाणे वरेण्य राजाने आचरण केले आणि मुक्ती मिळवली.
गणेशगीतेच्या अध्ययनाची, नित्य पठणाची फलश्रुती पुढीलप्रमाणे आहे. हा विश्वसनीय योग जो कुणी ऐकेल त्यालाही कैवल्यप्राप्ती होईल. जो चांगल्या बुद्धीचा माणूस ह्या योगाचा अर्थ इतरांना समजावून सांगेल त्यालाही मोक्ष मिळेल. जो ह्याचा अर्थ नीट समजावून घेईल व त्याचा अभ्यास करून गणेशगीतेचे नित्य पठण करून श्रीगणेशाचे पूजन करेल त्यालाही मुक्ती मिळेल. यज्ञ, दान, तप, वेदाभ्यास करून किंवा द्रव्य खर्च करून न मिळणारे परब्रह्म ह्या गणेशगीतेने माणसाना प्राप्त होते. महापातकी लोकांनीही श्रद्धेने गणेशगीता वाचली तर त्यानाही मोक्ष मिळतो.
अध्याय अकरावा सारांश समाप्त








