अध्याय अकरावा
बाप्पांनी समर्पणाच्या मार्गाबद्दल गणेशगीतेत सविस्तर सांगितले आहे. त्या उपदेशानुसार जो वाटचाल करेल त्याचा मीपणा गळून जाऊन तो निर्विकार होईल व त्याला त्याच्या आत्म्याचं परमात्म्याशी मिलन साधण्याचा दुर्मिळ योग साध्य होईल असं बाप्पानी सांगितलं. सर्वव्यापी अशा महात्मा बाप्पांनी सांगितल्याप्रमाणे वरेण्या राजाने कैवल्यपद प्राप्त करून घेण्यासाठी गृह व राज्याचा त्याग करून तो वनात गेला.
सर्वांनाच असा सर्वसंग परित्याग करून वनात जाऊन राहणं शक्य नाही कारण त्यासाठी मानसिक तयारी लागते. ती असेल तरंच ते शक्य होतं. अन्यथा फजिती होण्याची शक्यता अधिक असते. म्हणून प्रथम माणसाने निरपेक्षतेने कर्म करून जे मिळेल त्यात समाधानी रहावं म्हणजे मानसिक शांती मिळते. जो सतत अशा मानसिक शांतीचा धनी होतो तो अहंता, ममतारहीत होऊन निरिच्छ होतो. त्याला ब्रह्मनिर्वाण प्राप्त होते. ज्याच्या सर्व स्पृहा म्हणजे इच्छा संपलेल्या आहेत तो शांतिरुप होतो. ही शांतिरुप स्थिती ब्रह्मनिर्वाण मिळवून देते अशी ग्वाही भगवंतांनी श्रीमदभगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायात दिलेली आहे. हाच विचार या ग्रंथाची फलश्रुती म्हणून पुढील श्लोकातून मांडलेला आहे.
इमं गोप्यतमं योगं शृणोति श्रद्धया तु यऽ ।
सोऽपि कैवल्यमाप्नोति यथा योगी तथैव सऽ ।।39।।
अर्थ- अत्यंत गोपनीय असा हा योग जो श्रद्धेने श्रवण करील त्याला देखील योग्याप्रमाणे मोक्ष प्राप्त होईल.
विवरण- योगमार्गातील खडतर वाटचाल लक्षात घेता सर्वसामान्य माणसांसाठी ती वाट चोखाळणं शक्य नसते. हे लक्षात घेऊन त्यांनी किमान गणेशगीता ऐकावी ह्या हेतूने फलश्रुतीत असे सांगितले आहे की, जो कोणी अत्यंत श्रद्धेने, मन एकाग्र करून गणेशगीता वाचेल, ऐकेल त्याला ही कैवल्य प्राप्ती होईल. ह्या सांगण्यामागचा सुप्त हेतू असा की, जो गणेशगीतेचे नित्य वाचन, श्रवण करेल त्याला यातला गुह्य अर्थ हळूहळू लक्षात येऊ लागेल. तो जसजसा पचनी पडत जाईल, तसतसे त्याच्यावर बाप्पांना अपेक्षित असलेले संस्कार होत राहतील, त्याच्या मनात निष्काम भक्तीचा उदय होऊन तो विषयांच्या असक्तीतून मुक्त होईल. त्याच्या हातून नवीन पापकर्म होणार नाही आणि पुण्यवान भक्तांना प्राप्त होणारी ऊर्ध्वगती त्यालाही प्राप्त होईल. जेथे गणेशगीता आहे तेथे साक्षात बाप्पा रहात असतात हे लक्षात घेऊन भाविकांनी गणेशगीतेचे नित्य श्रवण पठण करावे म्हणजे त्यांचं मन सतत बाप्पांच्या अनुसंधानात राहील. जीवनातील इतर गोष्टी निरर्थक वाटू लागतील आणि मृत्यूनंतर स्वानंदलोकांची प्राप्ती होईल.
जेथे गणेशगीता आहे तेथे साक्षात बाप्पा रहात असतात हे लक्षात घेऊन भाविकांनी गणेशगीतेचे नित्य श्रवण पठण श्रद्धेने करावे म्हणजे मन सतत बाप्पांच्या अनुसंधानात राहील. जीवनातील इतर गोष्टी निरर्थक वाटू लागतील आणि मृत्यूनंतर स्वानंदलोकांची प्राप्ती होईल. ही गणेशगीता जो भाविकांना समजावून सांगेल त्यालाही मोक्ष मिळेल असं पुढील श्लोकात सांगितलं आहे.
य इमं श्रावयेद्योगं कृत्वा स्वार्थं सुबुद्धिमान् ।
यथा योगी तथा सोऽपि परं निर्वाणमृच्छति ।।40 ।।
अर्थ-गणेशगीता समजून घेऊन, त्यानुसार स्वत: योग आचरण करून हा योग दुसऱ्यांना ऐकवेल तो योग्याप्रमाणे परम मोक्ष पावेल.
विवरण- आत्म्याचं परमात्म्याशी मिलन म्हणजे सर्वोत्तम योग होय. हा योग साधण्यासाठी बाप्पांनी गणेशगीता सांगितली आहे. त्यानुसार आचरण करत गेल्यास आपल्या शरीरातील सुप्त ऊर्जा जागृत होते. आपली जागृत असलेली ऊर्जा दैनंदिन कार्यात खर्च होते पण गणेशगीतेच्या उपदेशानुसार आचरण करत गेल्यास सुप्त असलेली शारीरिक व मानसिक ऊर्जा जागृत होऊन तिचा उपयोग आपली आध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी होतो.
क्रमश:








