अध्याय एकविसावा
एकादश स्कंधांतील विसाव्या अध्यायात, भगवंतांनी उद्धवाला वेदांचा मतितार्थ उत्तम रीतीने सांगितला. त्यामुळे भक्त आणि ज्ञानी ह्यांना वेदार्थाची खूण पटली परंतु कर्मठ होते त्यांना भगवंतांनी उद्धवाला गुणदोषांकडे बिलकुल पाहू नकोस असे जे सांगितले होते त्याबद्दल संशय वाटू लागला कारण त्यांच्यामते गुणवगुणांवरूनच माणसाचे मूल्य ठरते मग जर गुणअवगुणच पहायचे नसतील तर माणूस जोखला कसा जाईल? त्यातीत डावा उजवा कसा ठरवता येईल? असे प्रश्न त्यांना पडले. माणसाचे वैयक्तिक गुणदोष पाहू नयेत असे भगवंतांचे म्हणणे होते. त्यामागे असा विचार होता की, जर सर्व प्राण्यांचे देह पंचमहाभूतांपासूनच तयार झालेले आहेत व सर्वांच्यात जर आत्मा एकच आहे तर सर्वजण एकसारखेच असल्याने अमुक एक गुणी आणि तमुक एक अवगुणी असे ठरवण्यात काहीच अर्थ नाही पण भगवंतांचे म्हणणे नीट समजून न घेता कर्मठ मंडळी संशय व्यक्त करतात. त्या संशयाचे निरसन भगवंत या अध्यायात करत आहेत. सुरवातीला त्यांच्या दृष्टीने गुणदोष कोणते हे सांगून, त्यांचा विषयांशी सबंध कसा आहे ते भगवंत विशद करतात. त्यानंतर विषयाचा त्याग कसा करावा याबाबतचे सविस्तर निरूपण ते करतात. ते म्हणाले, माझी प्राप्ती करून घेणे हे मनुष्य जन्माचे मुख्य कर्तव्य आहे. त्यासाठी भक्ती, ज्ञान आणि कर्म हे तीन शुद्ध वेदमार्ग आहेत पण ते सोडून जी मंडळी क्षुद्र भोग भोगीत राहतात, ती वारंवार जन्ममृत्यूरूप संसाराच्या चक्रात फिरत राहतात. देहाचा संबंध क्षणभंगुर आहे हे विसरून संसारांतील व स्वर्गातील सुखोपभोग मिळण्यासाठी लोभिष्ट लोक सकाम कर्माची भलामण करतात. काळ हा देहाला ग्रासतच असतो. असे असूनही इहलोकातील अनेक प्रकारच्या विषयोपभोगात व त्याच्या खटपटीतच मुर्ख लोक सुख मानतात. कामभोगांचे सोहळे भोगीत असताना जन्ममरणाच्या फेऱयांमध्ये दुःखाचे उमाळे भोगत राहतात. यातून सुटण्यासाठी वेदांच्या दृष्टीने गुणदोष कशाला म्हणायचं ते प्रथम सांगतो. धर्मांचे ठिकाणी दृढ नि÷ा ठेवणे याला गुण म्हटले आहे आणि याविरूद्ध वागणे हाच दोष आहे. तसं बघितलं तर कर्म सारे येथून तेथून एकच आहे परंतु त्यांच्याच योगाने सुखदुःख भोगणे भाग पडते. ते जर टाळायचे असेल तर निरपेक्षतेनं कर्म करणे माणसाच्या हिताचे आहे पण तसे न केल्याने माणूस स्वतःचे समाधान गमावून बसतो. माणसाच्या शरीरात आत्म्याच्या रूपाने ईश्वराचा अंश वास करत असतो आणि ईश्वर तर आनंद स्वरूप आहे म्हणून माणसाने नेहमीच समाधानी रहायला हवे. त्यासाठी माणसाने फळाची अपेक्षा न करता कर्म करणे अपेक्षित आहे पण माणूस त्याचा आनंद कशात आहे हे स्वतःच ठरवतो आणि तो मिळवण्यासाठी ईश्वराने दिलेली अनुकूलता नाकारून, प्रतिकुलता पत्करतो. कसे ते तुला उदाहरण देऊन सविस्तर सांगतो ऐक, भोजन करणे हे मुखाचे काम आहे पण जर आपण ते नाकाने करू लागलो, तर सुख जाऊन भयंकर दुःख मात्र भोगावे लागेल. पायांचे जे चालणे आहे ते जर डोक्मयाने करावे लागले, तर त्याने मार्ग सरावयाचा तर नाहीच पण अनिवार कष्ट मात्र भोगावे लागतील. थोडक्मयात ज्याचं काम त्यानं करावं हेच बरं कारण ते काम करण्यासाठी आवश्यक ती अनुकूलता निसर्गाने त्याला बहाल केलेली असते. त्या अनुकूलतेमुळे त्याने केलेले कर्म निश्चयपूर्वक सुखावह होते, त्याऐवजी जे काम करण्यास अनुकूलता नाही ते केल्यास दुःसह दुःख भोगावे लागते. हत्तीच्या पाठीवरील अंबारी जर गाढव त्याच्या पाठीवर ठेवा म्हणून हट्ट करू लागले तर ते काही गाढवाला शोभून दिसणार नाही. इतकेच नव्हे, तर ते त्या भाराने मरूनही जाईल. त्याप्रमाणेच नैसर्गिक अनुकूलता नसताना केलेल्या कर्माची अवस्था होते. मोक्ष मिळवणे हेच मनुष्य जन्माचे मुख्य साध्य आहे हे लक्षात घेऊन त्यासाठी निष्काम कर्म करणे अनुकूल असते तर सकाम कर्म करणे प्रतिकूल असल्याने अतिशय बाधक ठरते.
म्हणून निष्काम कर्माचरण करणें हाच मुख्य गुण होय आणि सकाम कर्म करणे हाच अवगुण होय.
क्रमशः







