सार्व. वाचनालयाच्या भजन स्पर्धेचे उद्घाटन
प्रतिनिधी / बेळगाव
भगवंताला केवळ पाया पडणे ही भक्ती नाही, तर अंत:करणातून भगवंताची आराधना करणे म्हणजे भक्ती. मनुष्य दिवसेंदिवस आळशी होत असून त्याला कोणत्याच कामाची इच्छा उरलेली नाही. त्यामुळे भक्तीमार्गाकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. परंतु, निष्काम भक्तीतूनच भगवंताची प्राप्ती होते, असे प्रतिपादन संतिबस्तवाड येथील हभप मष्णू माळी यांनी केले.
सार्वजनिक वाचनालयातर्फे श्रावणमासानिमित्त भजन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. 6 ते 10 सप्टेंबरदरम्यान मराठा मंदिरच्या सभागृहात भव्य भजन स्पर्धा घेतली जात आहे. उद्घाटनप्रसंगी वाचनालयाचे अध्यक्ष गोविंद राऊत, त्यांच्या पत्नी अंजना राऊत, चन्नम्मा विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. विनोद गायकवाड, उपाध्यक्ष अनंत लाड, कार्यवाह सुनीता मोहिते यासह इतर उपस्थित होते.
डॉ. विनोद गायकवाड यांनी भजनाविषयी आपले मनोगत व्यक्त केले. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विठुरायाच्या प्रतिमेचे पूजन करून स्पर्धेला सुरुवात झाली. या स्पर्धेमध्ये एकूण 41 संघांनी भाग घेतला असून महिलांचे 20 संघ तर पुरुषांचे 21 संघ भजन सादर करणार आहेत. बेळगाव, खानापूर व चंदगड तालुक्यातील वारकऱ्यांनी यामध्ये सहभाग घेतला आहे.
पहिल्या दिवशी ब्रह्मदेव महिला मंडळ, तेऊरवाडी-चंदगड, कलगुडी देवी भजनी मंडळ, आंबेवाडी, ता. चंदगड, सावित्रीबाई फुले महिला भजनी मंडळ, आंबेवाडी, ता. बेळगाव व लक्ष्मी भजनी मंडळ, बेळगुंदी यांनी अप्रतिम भजने सादर केली. सूत्रसंचालन अनंत लाड यांनी केले. नेताजी जाधव यांनी आभार मानले.









