ट्रंप यांच्याशी चर्चेनंतर पुतीन यांच्याकडून घोषणा
वृत्तसंस्था / वॉशिंग्टन डीसी
एक महिन्यासाठी युक्रेनच्या ऊर्जाकेंद्रांवरील हल्ले थांबविण्यास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मान्यता दिली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्याशी मंगळवारी पुतीन यांची दूरध्वनीवरुन चर्चा झाली. एक महिन्याच्या शस्त्रसंधीचा प्रस्ताव ट्रंप यांनी याआधीच ठेवला होता. एक महिन्याच्या कालावधीत युक्रेनच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांवरचे हल्ले रशिया थांबवेल असे आश्वासन पुतीन यांनी दिले आहे. त्यांची तशी घोषणाही या चर्चेनंतर केले असल्याचे समजते.
दोन्ही नेत्यांमध्ये मनमोकळी आणि सविस्तर चर्चा झाल्याची माहिती नंतर रशियाकडून देण्यात आली आहे. दोन्ही नेत्यांनी आपली मते या चर्चेत मांडली. संभाव्य शस्त्रसंधीच्या संदर्भात पुतीन यांनी अनेक अटी ठेवल्या. युव्रेनने सीमेवर सैनिकांची जमावाजमव करु नये आणि पाश्चिमात्य देशांनी युक्रेनला शस्त्रास्त्रांचा पुरवठा करु नये, या दोन मुख्य अटी पुतीन यांनी ठेवल्याचे स्पष्ट केले गेले.
ट्रंप यांचा प्रस्ताव
चर्चेत डोनाल्ड ट्रंप यांनी महत्वाचा प्रस्ताव मांडला. आगामी एक महिनाभर रशियाने युक्रेनच्या ऊजानिर्मिती केंद्रांवर हल्ले करु नयेत, असा हा प्रस्ताव आहे. पुतीन यांनी तो त्वरित मान्य केला. त्यामुळे युक्रेनचा वीजपुरवठा सुरळीत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुतीन यांनी त्वरित आपल्या सैन्याधिकाऱ्यांना युक्रेनच्या ऊर्जाकेंद्रांवरचे हल्ले थांबविण्याचा आदेश दिला असल्याची माहिती आहे.
कैद्यांची सुटका होणार
रशिया आणि युक्रेन एकमेकांच्या ताब्यात असलेल्या प्रत्येकी 175 कैद्यांची अदलाबदल करणार आहेत. ही योजनाही या चर्चेत समोर आली आहे. पुतिन आणि झेलेन्स्की यांना ती मान्य आहे. त्यामुळे या दोन्ही देशांच्या ताब्यात असणाऱ्या अनेक नागरीकांची सुटका या करारामुळे होण्याची शक्यता आहे.
अमेरिकेकडून समाधान
अमेरिकेने ट्रंप आणि पुतीन यांच्यातील दूरध्वनी चर्चेसंबंधी समाधान व्यक्त केले आहे. ही चर्चा भविष्यातील शांततेसाठी महत्वाची ठरली आहे. शांततेच्या दिशेने एक पाऊल या चर्चेमुळे पुढे पडले आहे. रशिया आणि युक्रेन यांच्यातील संघर्ष स्थायी स्वरुपात थांबेल अशी आशा या चर्चेमुळे निर्माण झाली असून भविष्यात अमेरिका त्यादिशेने वेगाने प्रयत्नशील राहील अशी शक्यता आहे.
शस्त्रपुरवठ्याचा मुद्दा
युव्रेनला अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य देशांकडून होणारा शस्त्रपुरवठा हा पुतीन यांच्या दृष्टीने महत्वाचा मुद्दा आहे. या शस्त्रपुरवठ्यामुळेच हे युद्ध लांबले आहे. यापुढे अमेरिकेने युक्रेनला शस्त्रे आणि गुप्त माहिती पुरवू नये, असा पुतीन यांचा आग्रह आहे. अमेरिकेने युक्रेनचा शस्त्रपुरवठा सध्या थांबवला असून गुप्त माहिती देण्याची प्रक्रियाही थांबविले आहे. या चर्चेत ज्या मुद्द्यांवर बोलणी झाली. त्यांच्यापैकी ऊर्जा केंद्रांवरील हल्ले थांबविण्याच्या मुद्द्याला युकेनचीही मान्यता मिळाली आहे. स्थिर आणि न्यायोचित शांततेसाठीच्या कोणत्याही प्रस्तावाला युव्रेनची मान्यता असेल, असे त्या देशाचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी स्पष्ट केले. या घडामोडींमुळे काहीसे आशादायक वातावरण निर्माण झाले असून ते पुढच्या काही दिवसात कसा आकार घेते यावर बऱ्याच बाबी अवलंबून आहेत. सध्यातरी प्रारंभ योग्य झ्ा़ाल्याचे दिसते, अशी आंतरराष्ट्रीय प्रतिक्रिया आहे.









