46 हजार जणांच्या मृत्यूनंतर हमासला उपरती
वृत्तसंस्था/ गाझापट्टी
इस्रायलच्या कारवाईत गाझामध्ये आतापर्यंत 46 हजारांहून अधिक लोक मारले गेले आहेत. तर तेथील इमारती जमीनदोस्त झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हमासच्या सर्वोच्च नेतृत्वाने 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर पेलेला हल्ला म्हणजे घोडचूक असल्याचे मान्य केले आहे. हमासचे विदेश विषयक प्रमुख मूसा अबू मारजूक यांनी कतारमध्ये बोलताना या हल्ल्याचे परिणाम असे असतील तर आम्ही कधीच तो केला नसता असे म्हटले आहे.
इस्रायलवरील हल्ल्याचे मी कधीच समर्थन केले नव्हते. इस्रायलवरील हल्ल्याचा परिणाम म्हणजे गाझामधील हजारो इमारती नष्ट झाल्या आणि हजारो निष्पापांना जीव गमवावा लागला असे मारजूक म्हणाले. गाझामध्ये 70 टक्के इमारती नष्ट झाल्या असून 20 लाख पॅलेस्टिनींना स्थलांतर करावे लागले असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघाचे सांगणे आहे.
19 जानेवारीपासून शस्त्रसंधी
19 जानेवारीपासून हमास आणि इस्रायल यांच्यात शस्त्रसंधी लागू आहे. यानुसार दोन्ही बाजूंकडून ओलीस अन् कैद्यांची मुक्तता केली जात आहे. परंतु गाझापट्टीमधून मुक्तता करण्यात आलेल्या ओलिसांसोबत अपमानास्पद वर्तनाचा निषेध नोंदवत इस्रायलने निर्धारित पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता रोखली आहे. पुढील ओलिसांची मुक्तता सुनिश्चित केली जात नाहीतोवर पॅलेस्टिनी कैद्यांची मुक्तता स्थगित केली जात आहे. याचबरोबर ओलिसांसोबत सन्मानजनक वर्तन करण्याची अट इस्रायलने ठेवली आहे. हमासने शनिवारी 6 इस्रायली ओलिसांची मुक्तता केली होती.









