रेवणी गल्लीतील घटना, एक जखमी : हद्दपार असलेल्या गुन्हेगाराचे कृत्य : परिसरात तणाव
प्रतिनिधी/मिरज
शहरातील रेवणी गल्ली येथे पूर्ववैमनस्यातून दोघा सख्ख्या भावांवर कोयत्याने प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची घटना रविवारी दुपारी तीन वाजता घडली. विशाल अनिल नाईक (वय 25) असे कोयता हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नांव आहे. याप्रकरणी पोलिसांनी खून प्रकरणातील हद्दपार आरोपी विनायक विजय चव्हाण (वय 29) याला अटक केली आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. भरदिवसा दोघा भावांवर कोयत्याने हल्ला झाल्याने रेवणी गल्लीसह परिसरात तणाव निर्माण झाला होता.
घटनास्थळावरुन मिळालेल्या अधिक माहितीनुसार, शहरातील रेवणी गल्ली येथे विनायक विजय चव्हाण याचे घर असून, काही अंतरावर विकास अनिल नाईक आणि विशाल अनिल नाईक हे सख्खे भाऊ राहण्यास आहेत. गेल्या दोन वर्षांपासून रेवणी गल्लीतील गटबाजीतून त्यांच्यात वाद आहेत. गणेशोत्सवापासून पुन्हा या दोन गटात धुसफुस सुरू होती. रविवारी हा वाद पुन्हा उफाळून आला. विकास नाईक हा गल्लीत थांबला असता विनायक चव्हाण व त्याचा साथीदार उमेश चव्हाण असे दोघेजण त्याच्याकडे रागाने बघत आले. यावेळी कोणत्याही कारणास्तव काहीही न बोलता विनायक याने विकासवर कोयत्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. हा हल्ला चुकवून विकास हा घरी पळत गेला. त्यानंतर विनायक हा हातात कोयता घेऊनच विकासचा पाठलाग करत घरात घुसला. यावेळी अश्लिल शिवीगाळ करत विकासला जीवे मारण्याची धमकी देऊ लागला.
यावेळी सदर भांडण सोडविण्यासाठी विकासची बहिण सुप्रिया आणि भाऊ विशाल हे दोघे आले असता विनायक याने सुप्रिया हिलाही धक्काबुक्की केली. त्यानंतर विकास आणि विशालवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये विशाल याच्या पायाला कोयता लागल्याने तो जखमी झाला आहे. तर विकास हा तेथून पळून गेल्याने हल्ल्यातून बचावला.
दरम्यान, घडल्या प्रकारानंतर रेवणी गल्लीसह परिसरात तणाव निर्माण झाला होता. मद्यधुंद अवस्थेत असलेला विनायक चव्हाण हा हातात कोयता घेऊनच थांबला असल्याने नागरिकांमध्येही घबराट पसरली होती. खून प्रकरणातील आरोपी आणि हद्दपार असतानाही विनायकने हत्यार घेऊन लोकवस्तीत दहशत माजविल्यामुळे नागरिकांमध्येही खळबळ उडाली. सदर प्रकाराची माहिती मिळताच मिरज शहर पोलिसांनी रेवणी गल्लीत धाव घेऊन विनायक चव्हाण याला अटक केली. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.