समर्थकांकडून हल्लेखोरांना मारहाण : दोघे पोलिसांच्या स्वाधीन
वृत्तसंस्था/ रायबरेली
उत्तर प्रदेशातील रायबरेली येथे राष्ट्रीय शोषित पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि माजी मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याची घटना उघडकीस आली आहे. स्वागतावेळी कार्यकर्त्यांकडून हार घालण्याचा प्रयत्न सुरू असताना एका हल्लेखोराने त्यांच्यावर थप्पड मारली. त्यानंतर समर्थकांनी हल्ला करणाऱ्या तरुणांना पकडून जोरदार मारहाण केली. समर्थकांनी केलेल्या मारहाणीमुळे आरोपी गंभीर जखमी झाले आहेत. माहितीनुसार, हल्ला करणारा तरुण करणी सेनेचा असल्याचे सांगितले जात आहे. परंतु संघटनेने याबाबत अद्याप कोणतीही पुष्टी केलेली नाही.
बुधवारी स्वामी प्रसाद मौर्य रायबरेलीतील गोल चौराहा येथे पोहोचले असताना त्यांच्या समर्थकांनी त्यांना हार घालून त्यांचे स्वागत करण्यास सुरुवात केली. त्यानंतर स्वामी प्रसाद मौर्य यांना हार घालण्याच्या बहाण्याने दोन तरुण गर्दीत घुसले. स्वामी प्रसाद मौर्य यांच्या मागून एक तरुण आला आणि त्यांनी त्यांना हार घालत थप्पड मारून वेगाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर मौर्य यांच्या समर्थकांनी दोन्ही हल्लेखोरांना पकडून मारहाण केली. यादरम्यान पोलिसांनी हस्तक्षेप करत हल्लेखोरांना समर्थकांपासून सोडवत त्यांना आपल्यासोबत नेले.
हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याच्या घटनेबाबत स्वामी प्रसाद मौर्य म्हणाले की, हे सरकारी गुंड आहेत. ते करणी सेनेचे आहेत. मी लखनौहून फतेहपूरला जात असताना रायबरेली येथे थांबलो होतो, तेव्हा माझ्यासोबत ही घटना घडली. या घटनेबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









