कॅम्प पोलीस स्थानकात फिर्याद
बेळगाव : क्लब रोडवरील मेथॉडिस्ट संस्थेचे बेननस्मिथ कॉलेज आणि शारीरिक शिक्षणचे प्रभारी मुख्याध्यापक यांच्यावर 25 ते 30 जणांच्या टोळक्याने हल्ला करून त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात कॅम्प पोलीस स्थानकामध्ये फिर्याद देण्यात आली आहे. पोलीस फिर्याद नोंदविण्यास टाळाटाळ करत होते. रात्री उशिरा फिर्याद नोंदवून घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. मेथॉडिस्ट चर्चचे बिशप एन. एल. करकरे यांनी सीपीएड् मैदानाची संपूर्ण जबाबदारी महाविद्यालयाचे प्राचार्य अरुणकुमार जयवंत यांच्याकडे दिली आहे. त्यामुळे मैदानात कोणताही खासगी कार्यक्रम करायचा असेल तर त्यांची परवानगी घेऊन ठरलेली रक्कम महाविद्यालयाच्या खात्यात जमा करायची असते. याचबरोबर रितसर परवानगी पत्रकही घ्यावे लागते. मात्र काहीजण चर्च आणि संस्थेच्या नावाने बनावट परवानगी पत्रके काढून परवानगी देत आहेत. याचबरोबर रोख रक्कमही त्यांनी लाटली. त्याला मुख्याध्यापकांनी तीव्र विरोध केला. अनधिकृतपणे परवानगी दिलेल्यांची त्यांनी चौकशी केली. त्यामुळे रागाने 25 ते 30 गुंड घेऊन मुख्याध्यापकांवर हल्ला केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. मला व माझ्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही त्यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. दिनकर चिल्ला, शांत मुडलगी, मधुकर उतंगी, सूर्यकांत कोरविनकोप्प, श्रीपाल मल्लण्णावर यांच्या विरोधात त्यांनी ही फिर्याद दिली आहे. कॅम्प पोलिसांनी फिर्याद नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.









